
मुंबई : भारत ऊर्जा सप्ताह २०२५ हा १ लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम, प्रदर्शन स्थळाची भव्यता आणि त्यातील सत्रांमुळे जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम ठरेल, असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
भारत ऊर्जा सप्ताह २०२५ बाबत मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नवी दिल्लीतील द्वारका येथील यशोभूमीवर ११ ते १४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आयईडब्ल्यू २०२५ मध्ये मंत्री, सीईओ आणि उद्योग धुरीण यांच्याकडून जागतिक सहभागाचे आश्वासन देण्यात आले आहे. ऊर्जा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या क्लीन कुकिंग मिनिस्टरियल कार्यक्रमावर त्यांनी प्रकाश टाकला. हा कार्यक्रम स्वच्छ स्वयंपाक उपायांचा जागतिक स्तरावर स्वीकार वाढवण्यासाठी सहयोगी प्रयत्नांना बळकटी देणारा एक महत्त्वाचा मंच म्हणून काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.