

मुंबई : नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक असून या कामादरम्यान अभियंत्यांची उपस्थिती असणे अनिवार्य आहे. जर कुठेही जाणीवपूर्वक गैरप्रकार करण्याचा कुणी प्रयत्न केला, असे निदर्शनास आले तर कंत्राटदार व अधिकारी या दोघांवर अत्यंत गंभीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे.
बांगर यांनी मिठी नदी व पूर्व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेस्वच्छता कामांची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. कंत्राटदारामार्फत केल्या जाणाऱ्या कामामध्ये संपूर्ण पारदर्शकता राहावी, यासाठी अभियंत्यांनी दक्ष राहणे आवश्यक आहे, असेही त्यांनी बजावले.
मिठी नदीसह मुंबईतील लहान मोठ्या नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील ५७ दिवसांत ९ लाख ६० हजार ७१३ गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. शहरातील दरम्यान, मिठी नदीतील गाळ उपसा करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे.
पूर्व उपनगरांतील मिठी नदीवर सुरू असलेल्या तीन पॅकेज अंतर्गत पाच ठिकाणी कामांची सुरुवात झाली आहे. त्यापैकी तीन ठिकाणी (कनेक्टर ब्रिज, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील एमएमआरडीए कार्यालय (जेतवन उद्यान) आणि अंबानी शाळालगत) बांगर यांनी आज भेट दिली. यासोबतच मुलुंड पूर्व (टी विभाग) येथील बाऊंड्री नाला, घाटकोपर (एन विभाग) येथील सोमय्या नाला येथेही भेट दिली.
गाळ काढण्याच्या कामात स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवून त्यांच्या सूचनांच्या बाबतीत गांभीर्याने पूर्तता करावी, असे बांगर यांनी सांगितले. मिठी नदीसह मोठ्या व छोट्या नाल्यातून गाळ काढण्याची कार्यवाही सुरू आहे. ३१ मे २०२६ पर्यंत निर्धारित संपूर्ण काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.
माहिती डॅशबोर्डवर द्या!
नालानिहाय कामे कधी सुरू होणार, कधी संपणार याचे काटेकोर नियोजन करण्यात यावे.
कामाची माहिती महापालिकेच्या डॅशबोर्डवर उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून आपल्या परिसरातील नालेसफाईचे काम कधी सुरू होणार आहे व कधी संपणार आहे, याची माहिती नागरिकांना मिळणे शक्य होईल.
कंत्राटदाराने निविदा अटी-शर्तीप्रमाणे किती यंत्रसामुग्री वापरात आणणे अपेक्षित आहे व दररोज किती यंत्रसामुग्री उपलब्ध आहे, याची अद्ययावत माहिती उपलब्ध करावी. सदर माहिती नालेसफाईच्या संगणक प्रणालीवरसुद्धा (डॅशबोर्ड) प्रदर्शित करण्यात यावी.
नाल्यांमधील पाण्यावर वाहणारा तरंगता कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी शक्य तेथे तरंगता कचऱ्याला अटकाव करणारी १४ ट्रश बूम यंत्रणा लावण्यात यावी, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले.