

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेने अभियंत्यांच्या बदल्यांसाठी न प्रस्तावित केलेल्या सर्वसमावेशक ऑनलाइन बदली धोरणाला बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. या धोरणामुळे बदल्यांमधील कथित अनियमितता कमी होऊन अधिक पारदर्शकता येईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. मात्र, बदल्या करताना अभियंत्यांचे निवासस्थान, अपंग कर्मचारी आणि अत्यावश्यक विभागांतील मनुष्यबळ यांचा विचार करुन घराजवळच बदली करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष यशवंत धुरी आणि सरचिटणीस संजय सावंत यांनी ७ सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून विविध सूचना केल्या आहेत.
संघटनेने नमूद केले आहे की, महापालिकेतील बहुतांश अभियंत्यांची स्वतःची घरे पनवेल, कर्जत, कसारा, विरार, पालघर आदी दूरच्या भागांतून रोज प्रवास करतात. त्यामुळे शक्य असेल तेथे अभियंत्यांची नियुक्ती त्यांच्या निवासस्थानाच्या रेल्वे मार्गाच्या त्याच बाजूच्या विभागात करण्यात यावी. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.