
मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून उत्तरेकडे जाताना वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार २६ जानेवारी रोजी होणार आहे. त्यासोबतच वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोट्स जंक्शन आदी भागातील प्रवाशांना किनारी रस्ता प्रकल्पावर ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिकांचे लोकार्पण देखील यावेळी होणार आहे. सोमवार २७ जानेवारीपासून या सर्व मार्गिंकावरून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होणार आहे. तसेच मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.
मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर मुंबईच्या टोकापर्यंत म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्याटप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. आजपर्यंत प्रकल्पाची ९४ टक्के बांधणी पूर्ण झाली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरून दिनांक १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ५० लाख वाहनांनी ये-जा केली आहे. तसेच या मार्गावरून दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास सुरू असतो. प्रकल्पातील दक्षिण मुंबईकडून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक वांद्रे-वरळी सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत.
वाहतुकीसाठी पुढील मार्ग होणार खुले
मरीन ड्राईव्हकडून मुंबई किनारी रस्ता मार्गे सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक ही लोकार्पण होत असलेल्या उत्तर वाहिनी पुलावरून सुरू होणार आहे.
उत्तर वाहिनी पुलाचा वापर नियमित दिशेने म्हणजेच वांद्रेकडून मरीन ड्राईव्हकडे येण्यासाठी करता येईल.
मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे किनारी रस्त्यावरून जाण्यासाठी बांधलेली आंतरमार्गिका देखील खुली होणार आहे.
मरीन ड्राईव्हकडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी वाहतूकही खुली होणार आहे. त्यामुळे लोअर परळ, वरळी नाका आणि लोटस जंक्शनकडे जाणारी वाहतूक खुली होणार आहे.
बिंदू माधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका देखील खुली होणार आहे.