रेल्वे हद्दीत मलेरियाचा शिरकाव स्थानकांच्या छतावर मलेरियाच्या डासांच्या अळ्या

कीटकनाशक विभागातर्फे फवारणी
रेल्वे हद्दीत मलेरियाचा शिरकाव स्थानकांच्या छतावर मलेरियाच्या डासांच्या अळ्या

मुंबई: मुंबईत साथीच्या आजारांचा फैलाव होत असून, रेल्वे हद्दीतही मलेरियाचा शिरकाव झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानक दादर, माटुंगा रोड, माहीम व मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्थानकात व छतावर ९ ठिकाणी मलेरियाचा फैलाव करणाऱ्या ॲॅनोफिलीस डासांच्या अळ्या आढळल्याचे मुंबई मनपाच्या जी उत्तर विभागाने सांगितले. दरम्यान, उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उच्चभ्रू वस्तीसह झोपडपट्टीत साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत आहे. मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो, कावीळ आदी साथीचे आजार पसरले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या जी उत्तर विभागाने डासांच्या अळ्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दादर, माहीम, माटुंगा व शीव स्थानकातील शेडवर मलेरियाचा फैलाव होणाऱ्या ९ ठिकाणी डासांच्या अळ्यांची उत्पत्ती स्थाने आढळली. डासांच्या अळ्यांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागातर्फे औषध फवारणी सुरू केल्याचे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील अन्य रेल्वे स्थानकातील शेडवर डासांच्या अळ्यांची उत्पत्ती स्थाने आढळण्याची शक्यता लक्षात घेता कीटकनाशक विभागाने शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे.

मुंबई मनपातर्फे फवारणी!

मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ, डेंग्यू आदी साथीचे आजार पावसाळ्यात पसरतात. त्यांचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने डासांच्या अळ्यांचा शोध घेत कीटकनाशक फवारणीची मोहीम सुरू केली आहे. पाण्याच्या टाक्या, टेरेसवर टाकलेले अडगळीचे सामान, झोपडपट्टीमधील पाण्याचे ड्रम, प्लास्टिक ताडपत्रीमध्ये पावसाचे साचलेले पाणी, भंगार वस्तू, बांधकामे इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान डास आळ्या आढळून आल्यास उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात येतात किंवा योग्य त्या कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे.

घर परिसर स्वच्छ ठेवा

पालिकेच्या दादर जी/उत्तर विभागातर्फे दादर, माहीम, माटुंगा व धारावी परिसरात मलेरिया, डेंग्यू नियंत्रणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

नागरिकांनी आपल्या घरात, कार्यालयात आणि परिसरात पाणी साचू शकतील अशी ठिकाणे तात्काळ नष्ट करावीत, असे आवाहन पालिकेने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in