मूर्तिकारांना रंगांचे मोफत वाटप; पालिकेकडून पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना महानगरपालिकेकडून प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक रंग पुरवठा करण्यात येणार आहे. एकूण सहा पर्यावरणपूरक रंगांचा यामध्ये समावेश आहे. यात ७ हजार ८०० लिटर रंग आणि ३ हजार लिटर इको प्रायमर पुरविण्यात येणार आहे. मूर्तिकारांनी या रंगांचा वापर करून श्रीगणरायाच्या मूर्ती रंगवाव्यात, जेणेकरून जलप्रदूषण रोखण्यास मदत होईल, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना महानगरपालिकेकडून प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक रंग पुरवठा करण्यात येणार आहे. एकूण सहा पर्यावरणपूरक रंगांचा यामध्ये समावेश आहे. यात ७ हजार ८०० लिटर रंग आणि ३ हजार लिटर इको प्रायमर पुरविण्यात येणार आहे. मूर्तिकारांनी या रंगांचा वापर करून श्रीगणरायाच्या मूर्ती रंगवाव्यात, जेणेकरून जलप्रदूषण रोखण्यास मदत होईल, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने अधिकाधिक पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांना आवाहन केले आहे. यासाठी महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरविण्यात आली आहे. आतापर्यंत ९५२ टन माती पुरविण्यात आली आहे. यासोबतच ९९७ मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी मंडपाकरिता जागाही देण्यात आली आहे. मूर्ती रंगविण्यासाठी वापरले जाणारे रंग विशेषतः रासायनिक रंग हे पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी जलस्रोतांचे प्रदूषण होऊन सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शक्य तितक्या पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करावा आणि जलाशयांचे प्रदूषण टाळावे असे आवाहन पालिकेने केले.

सहा रंग पुरविणार

महानगरपालिका प्रशासन आता मूर्तिकारांना मूर्ती रंगविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक रंगही देणार आहे. यामध्ये पांढरा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा आणि लाल असे सहा पर्यावरणपूरक रंग महानगरपालिकेकडून मूर्तिकारांना पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये इतर रंगांच्या तुलनेत पांढरा रंग मोठ्या प्रमाणात पुरविण्यात येणार आहे. यासोबतच पर्यावरणपूरक पांढरा प्रायमरही देण्यात येणार आहे. मूर्तिकारांनी आपापल्या परिसरातील प्रशासकीय विभाग कार्यालयात (वॉर्ड ऑफिस) संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सवाचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in