मुंबई: मुंबई मनपाच्या केंद्रीय खरेदी विभागाचे प्रमुख मनपाचे माजी उपायुक्त रमाकांत बिरादार यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. कोविड काळात चढ्या दराने मृतदेह बॅग खरेदी प्रकरणात त्यांना हे समन्स बजावले.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात मृतदेह बॅग खरेदीप्रकरणी यापूर्वीच गुन्हा नोंदवला आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. या बॉडीबॅग प्रकरणी ईओडब्ल्यूकडून चौकशी सुरू आहे.
कोरोना काळात कोरोनाने मरण पावलेल्या रुग्णांचा मृतदेह या बॉडीबॅगमध्ये ठेवला जात होता. या बॉडीबॅग खरेदीत घोटाळा केल्याचे पेडणेकर यांच्यावर आरोप होत होते. दरम्यान, ईडीकडून ३८ कोटींच्या जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याचा तपास सुरू आहे. एका नामवंत कंपनीने या बॉडीबॅग पुरवल्या होत्या. कंपनीने प्रति बॅग ६८०० रुपये किंमत आकारली होती. खासगी रुग्णालयांपेक्षा पालिका रुग्णालयात बॉडीबॅगची किंमत तिप्पट होती.