चाहूल पावसाची, धोका लेप्टोचा!

भटके कुत्रे आणि चोरांच्या भीतीने खासगी संस्थांचा उंदीर मारण्यास नकार, ३ वर्षांत तब्बल ९ लाखांहून अधिक उंदरांचा खात्मा
चाहूल पावसाची, धोका लेप्टोचा!
Published on

लेप्टोच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्यासाठी २२ खासगी संस्थांची निवड करण्यात आली होती.‌ मात्र मनुष्यबळ मिळत नाही. त्याशिवाय रात्री उंदरांचा शोध घेताना दारुडे, चोर, भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागतो, अशी विविध कारणे देत सहा संस्थांनी उंदीर मारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पालिकेच्या २४ वॉर्डांमध्ये फक्त १६ संस्थांवर उंदरांचा शोध घेत वेळीच खात्मा करण्याची यंदा जबाबदारी आहे. दरम्यान, गेल्या ३ वर्षांत २०२० ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत तब्बल ९ लाख ७४ हजार २५९ उंदरांचा खात्मा करण्यात आला आहे.

मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, कावीळ, लेप्टो या साथीच्या आजारांचा पावसाळ्यात झपाट्याने प्रसार होतो. लेप्टो पसरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या उंदीरांचा खात्मा करण्यासाठी नोंदणीकृत संस्था, बेरोजगार सहकारी सेवा संस्था यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साचलेल्या पाण्यात उंदीर, गायी, म्हशी, घोडे, कुत्रे आणि मांजर यांचे मलमूत्र असल्यास आणि त्याचा संपर्क जखम असलेल्या व्यक्तीबरोबर आल्यास अशा व्यक्तीला लेप्टोचा संसर्ग होतो. लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी किटक नाशक विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येते. उंदरांना हाताने मारण्याबरोबरच अ‍ॅल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्या टाकून मारले जाते. पावसाळ्याआधी प्रत्येक ठिकाणी तीन ते चार वेळा ही मोहीम राबवली जाते. पावसाळ्यात ही मोहीम बंद असते. मात्र, ज्यावेळी दोन ते चार दिवस पाऊस पडत नाही, त्यावेळी पुन्हा गोळ्यांचा वापर केला जातो. त्यामुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते, अशी माहिती पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून देण्यात आली.

उघड्यावरील अन्न उंदरांना आमंत्रण

भंगार व अडगळीच्या वस्तू घरात ठेवू नका. इमारतीचा परिसर, आवार स्वच्छ ठेवा. डेब्रिज व इतर सामान आवारात ठेवू नये, जेणे करून उंदरांना आसरा मिळणार नाही. अन्नपदार्थ उघड्यावर टाकू नये. उंदरांना खायला मिळाले की तिथेच ते बिळे करून राहतात व कालांतराने त्यांची संख्या वाढते. एक उंदीर मादी एका वेळेस ६ ते ८ उंदरांना जन्म देते. त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते.

असे दिले जातात कामाचे पैसे

- एक उंदीर मारल्यास २३ रुपये.

- दिवसाला १०० उंदीर मारले तर प्रत्येक उंदरामागे २३ रुपये.

- दिवसाला १०० पेक्षा अधिक उंदीर मारल्यास प्रत्येकी २५ रुपये.

- दिवसभरात १००च्या आत उंदीर मारले, तर फक्त ११ रुपये ५० पैसे.

- दिवसात ५०हून कमी उंदीर मारले, तर एकही रुपया दिला जात नाही.

डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट

रात्री उंदीर मारल्यानंतर संस्थेचे कर्मचारी संबंधित वॉर्डात मारलेले उंदीर घेऊन येतात. त्याठिकाणी पालिकेचा स्टाफ उंदीर किती मारले याची नोंद ठेवतो. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वाहनातून डम्पिंग ग्राऊंडवर पाठवले जातात. त्याठिकाणी उंदरांची विल्हेवाट लावली जाते.

प्लेगची तपासणी होते

२४ वॉर्डांमध्ये उंदीर मारल्यानंतर संस्थेचे कर्मचारी त्या-त्या वॉर्डात उंदीर घेऊन येतात. मारलेल्या उंदरांपैकी प्रत्येक वॉर्डातील एक दोन उंदीर नाशक विनाशक आस्थापना येथे तपासणी पाठवण्यात येतात. प्लेगची लागण झाली आहे का, याची विशेष करून तपासणी करण्यात येते.

logo
marathi.freepressjournal.in