साथीच्या आजारांचा मुंबईला विळखा! दीड लाख लोकांचे रक्ताचे नमुने गोळा १७ लाखांहून अधिक घरांची झाडाझडती

अॅनोफिलीस व एडिस डासांच्या २५ हजार उत्पत्ती स्थानांचा शोध
साथीच्या आजारांचा मुंबईला विळखा! दीड लाख लोकांचे रक्ताचे नमुने गोळा १७ लाखांहून अधिक घरांची झाडाझडती

मुंबई : यंदा पावसाने पाठ फिरवली असली तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा मात्र मुंबईला घट्ट विळखा बसला आहे. साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. साथीच्या आजारांच्या रुग्णांचे निदान करत वेळीच उपचार करणे शक्य व्हावे, यासाठी १६ लाख ८८ हजार ७२० घरांची झाडाझडती घेण्यात आली. यात ७४ लाख ६३ हजार ९८१ लोकांचे सर्वेक्षण करत तब्बल १ लाख ५४ हजार ४८ लोकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मलेरिया डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत अॅनोफिलीस व एडिस डासांच्या २४ हजार ५१२ उत्पत्ती स्थाने आढळून आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

पावसाने पाठ फिरवल्याने जून कोरडा गेला, जुलै महिन्यात वरुणराजा चांगलाच बरसला. मात्र संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने पाण्याची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे पावसाने पाठ फिरवली असली तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा मात्र घट्ट विळखा मुंबईला बसला आहे. ऑगस्टच्या २७ दिवसांत स्वाईन फ्लूचे १०८, मलेरियाचे ९५९, लेप्टोचे २६५, डेंग्यूचे ७४२, गॅस्ट्रोटे ८१९, कावीळीचे ७७ आणि चिकनगुनियाचे ३४ रुग्ण आढळले आहेत. पावसाळी आजार वाढत असल्यामुळे पालिकेकडून प्रमुख रुग्णालयासह उपनगरीय रुग्णालयांत तीन हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. तर पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मलेरिया रोखण्यासाठी झाडाझडती

मलेरिया टाळण्यासाठी अ‍ॅनोफिलीस डासाची उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्यासाठी २५ हजार २१२ घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६८ हजार ९१४ प्रजननस्रोतांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३ हजार २७८ ठिकाणी मलेरिया डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली.

डेंग्यू नियंत्रणासाठी शोध मोहीम

डेंग्यूला आळा घालण्यासाठी एडिस डासांचा शोध घेण्यासाठी १४ लाख ७ हजार २१६ घरांची तपासणी करण्यात आली. यात १५ लाख ६६ हजार ६५३ कंटेनरची तपासणी करण्यात आली. या तपासणीत २१ हजार २३४ ठिकाणी एडिस डासाची ठिकाणे आढळली.

८ हजार उंदरांचा खात्मा!

लेप्टोच्या प्रसारास उंदीर कारणीभूत ठरत असल्यामुळे खासगी संस्था आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मूषक नियंत्रण मोहीम राबवण्यात येत आहे. १ ते २७ ऑगस्टदरम्यान राबवलेल्या विशेष मोहिमेत ८ हजार ९ उंदरांचा खात्मा करण्यात आला आहे. यात विषारी गोळ्या टाकून ३,७६९ तर पिंजरे लावून ४,२४० उंदरांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

खबरदारी घ्या!

गॅस्ट्रो, कावीळ व टायफाईड या जलजन्य आजारांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु मुंबईकरांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. पाणी उकळून प्यावे, पाणी जास्तीत जास्त प्यावे, रस्त्यांवरील उघडे खाद्यपदार्थ खाणे टाळा, अशी जनजागृती पालिकेकडून करण्यात येत आहे.

स्वाईन फ्लूचा धोका टाळा!

मास्कचा वापर करा, गर्दीची ठिकाणे टाळा, शिंकताना किंवा खोकताना रुमालाचा योग्य वापर करावा, वारंवार साबणाने हात धुवणे, डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा.

logo
marathi.freepressjournal.in