
मुंबई : प्रत्येक प्रभागातील विकास करण्यासाठी प्रत्येक प्रभागात समान निधी वाटप करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. २४ वॉर्डातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिकेत गेली १८ महिने प्रशासकीय राज्य आहे. मुंबई महापालिकेत ७ मार्च २०२२ पासून नगरसेवक नसल्याने मुंबईकरांच्या समस्या जैसे थे आहेत. प्रत्येक प्रभागातील विकासकामे झाली पाहिजेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे पालिकेच्या २४ वॉर्डातील २२७ प्रभागात विकासकामांसाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून तसे निर्देश आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि मुंबई महापालिकेत ८ मार्चपासून प्रशासकीय राज्य आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवक नसल्याने मुंबईकरांच्या समस्या जैसे थे आहेत नगरसेवक नसल्याने असमान निधी वाटप करत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रत्येक प्रभागात निधीवाटप करत विकासकामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, याबाबत विचारणा करण्यासाठी पालिका आयुक्तांना व्हॉट्सॲॅपवर संपर्क साधला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.