प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी एसी लोकलच्या डब्याखाली उपकरणे 

पश्चिम रेल्वेची यशस्वीपूर्ण चाचणी;  लवकरच नव्या प्रयोगासहित एसी लोकल धावणार 
प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी एसी लोकलच्या डब्याखाली उपकरणे 

बारा डब्याच्या सामान्य लोकल गाडीला तीन मोटरकोच असतात. या मोटरकोचमध्ये पेंटाग्राफ, तसेच डब्यातील पंखे, दिवे यांसह अन्य यंत्रणा हाताळण्यासाठी उपकरणे असतात. तसेच सध्या सेवेत असलेल्या वातानुकूलित लोकल गाडीलाही अशी स्वतंत्र यंत्रणा असल्याने प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कमी आहे. वातानुकूलित लोकलमधील ही उपकरणे लोकल डब्याच्या खाली बसवून प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा करण्याचा नवीन प्रयोग पश्चिम रेल्वेकडून करण्यात आला आहे. ही अशा प्रकारची पहिली वातानुकूलित लोकल लवकरच पश्चिम रेल्वेच्या सेवेत दाखल होणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेवर दररोज ४८ वातानुकूलित लोकल फेऱ्या होत होत्या. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे १ ऑक्टोबरपासून सामान्य लोकल फेऱ्यांच्या बदल्यात ३१ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांची एकूण संख्या ७९ एवढी झाली. दरम्यान, सध्या पश्चिम रेल्वेकडे सहा वातानुकूलित लोकल आहेत. या लोकलमधील उपकरणे डब्याखाली बसविण्यात आली असून ही नवी वातानुकूलित लोकल लवकरच सेवेत येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या लोकलची चाचणी सुरू होती. उपकरणे डब्याखाली असल्याने कोणतीही तांत्रिक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. परिणामी, या लोकलची चाचणी घेण्यात येत होती. चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर ही लोकल सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार नियोजन सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in