मालमत्ता कर भरण्‍यासाठी आस्‍थापनांनी मागितली मुदत; ३१ मार्च २०२४ पूर्वी कर भरण्‍याचे केले मान्य

बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'मालमत्ता कर' थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करताच अनेक थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
मालमत्ता कर भरण्‍यासाठी आस्‍थापनांनी मागितली मुदत; ३१ मार्च २०२४ पूर्वी कर भरण्‍याचे केले मान्य

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'मालमत्ता कर' थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करताच अनेक थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. पालिकेने वसुली सुरू करताच करदात्यांकडून धनादेश (चेक), धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) भरणा करण्यास सुरुवात केली आहे. तर, काहींनी दिलेल्या मुदतीत कर भरणा करण्याचे मान्य केले आहे. दरम्‍यान, नागरिकांनी वेळेत कर भरणा करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मालमत्ता कर थकबाकी असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाचा कर आणि थकीत कर भरणा करावा यासाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. थकबाकी व चालू आर्थिक वर्षाचा कर वसुलीसाठी अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. करदात्यांना कर भरणा करण्याचे आवाहन मायकिंगद्वारे, दर्शनीय ठळक बॅनरद्वारे तसेच स्थानिक केबलद्वारे जनजागृती करून ३१ मार्च २०२४ पर्यंत करभरणा करणेबाबत प्रोत्साहित करण्यात येत आहे.

मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका करनिर्धारण व संकलन खात्याद्वारे जनजागृती केली जाते आहे. वारंवार आवाहन, मोबाईलवर एसएमएस पाठवून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत सूचित करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मेसर्स भारत डायमंड फोर्स आणि गोदरेज ग्रीन होम्स लिमिटेड यांनी २५ मार्च २०२४ रोजी नियमित कर भरणा करण्याचे मान्य केले आहे. ते थकबाकीदार नसून प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये वेळेत कर भरणा करतात. त्यांचा चालू आर्थिक वर्षाचा कर ३१ मार्च २०२४ पूर्वी भरून महानगरपालिकेला सहकार्य करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in