३७० किलोमीटरचा पायी प्रवास १४ दिवसात पूर्ण करूनही सरकारदरबारी न्याय नाही ;साधे निवेदन घेण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही

या सरकारचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया धनगर समाजाचे उपोषणकर्ते आझाद मैदानात देत होते.
३७० किलोमीटरचा पायी प्रवास १४ दिवसात पूर्ण करूनही सरकारदरबारी न्याय नाही ;साधे निवेदन घेण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही

मुंबई : सातारा जिल्ह्यातील म्हसवड ते मुंबईतील आझाद मैदान, असा पायी ३७० किलोमीटरचा प्रवास १४ दिवसात पूर्ण करून आम्ही आझाद मैदानात प्रवेश केल्यानंतर काही वेळानी ‘आंदोलनकर्त्या शिष्टमंडळाला मंत्रालयात घेऊन या,’ असा आझाद मैदानातील पोलिसांना वायरलेसवर संदेश आला. आम्ही पोलिसांबरोबर मंत्रालयात गेलो. पोलिसांनी आम्हाला मंत्रालयातील एका दालनातून दुसऱ्या दालनात, दुसऱ्या दालनातून तिसऱ्या दालनात, तिसऱ्या दालनातून पुढे पुढे करत कुणाचीही भेट न घडवता पुन्हा आझाद मैदानात आणून सोडले. आमच्या मागण्यांचे साधे निवेदनही मंत्रालयात कुणी घेतले नाही. त्यामुळे या सरकारचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया धनगर समाजाचे उपोषणकर्ते आझाद मैदानात देत होते.

माणदेश मधील सातारा जिल्ह्यातील म्हसवड ते मुंबई असा ३७० किलोमीटर पायी प्रवास करून आमच्या पायाला फोड आले. पाय दुखू लागले आहेत. आता समाजाला काय उत्तर देणार? असा संतप्त सवाल धनगर समाजाचे उपोषणकर्ते सरकारला करत आहेत.

केंद्र सरकारच्या प्रशासनातील हिंदी भाषिक अधिकाऱ्यांच्या ‘धनगड’ व ‘धनगर’ या शब्दाच्या खेळात आमचा समाज आज मेंढरं घेऊन दारोदार भटकत आहे. अनेक सवलतीपासून वंचित आहे. या सवलती मिळाव्या म्हणून आम्ही माणदेशमधील तळागाळातील सामान्य धनगर म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरापासून उपोषण करून मुंबईत न्याय मागण्यासाठी पायी प्रवास सुरू केला. १४ दिवस ३७० किलोमीटर प्रवास करत मुंबईत दाखल झालो. समाज बांधवांनी मुबईच्या वेशीवर स्वागत केल्यानंतर आझाद मैदानात प्रवेश केला.

अण्णा हजारे, मेधा पाटकर असे अनेक समाजसेवक या मैदानात आंदोलन करून सरकारला वेळोवेळी न्याय मागत होते. आम्हीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजासाठी न्याय मिळावा म्हणून पुढील कार्यवाही पोलिसांच्या मदतीने पार पाडत होतो. सायंकाळी तीन वाजता मंत्रालयातून पोलिसांना वायरलेस वर संदेश आला, ‘भेटीसाठी घेऊन या.’ आम्ही पोलिस गाडीतून मंत्रालयात पोहचलो. जाताना मनात एक मोठी आशा होती. आता आपल्याला मंत्री भेटणार, सचिव भेटणार. आपल्या मागण्यांचे निवेदन स्वीकारणार, मात्र असे काहीच झाले नाही.

आम्ही पोलिस मुद्दाम करत नाही...

आंदोलनकर्त्यांची भेट घडवणे हा आमचा कामाचा भाग आहे. प्रामाणिकपणे आम्ही भेटीसाठी प्रयत्न करतो. मात्र मंत्रालयातील अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे व आमच्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आम्हाला कार्यवाही करावी लागते. असे अनेकदा होत असते. या अगोदरही अनेक वेळा आंदोलनकर्त्याच्या भेटी झाल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी भेटी झालेल्या आहेत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था व परिस्थिती याचा विचार करत पोलिसांना सहकार्य करावे.

logo
marathi.freepressjournal.in