मुंबई : खड्डे बुजवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान, १४४ कोटी रुपये खर्च तरीही मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे सुस्थितीत कसे, याचा शोध आता दक्षता विभाग घेणार आहे. खड्डे बुजवण्यात दिरंगाई, निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर तर संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करणार, असा इशारा मुंबई महापालिकेच्या दक्षता विभागाने दिला आहे. दरम्यान, मुंबईत पावसाची एंट्री झाल्यापासून गेल्या १० दिवसांत १८२ तक्रारी खड्ड्यांच्या मुंबई महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत.
जून महिना संपताअखेर वरुणराजाने आपली कृपादृष्टी मुंबईवर दाखवली. वरुणराजाच्या आगमनाने मुंबईकर सुखावला असला तरी मुंबईच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या दहा दिवसांत खड्डे पडल्याच्या १८५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील बहुतांशी खड्डे भरण्यात आले असून ५० ठिकाणी काम बाकी असल्याची माहिती पालिकेच्या आकडेवारीतून समोर आली आहे. त्यामुळे पालिकेने खड्डे बुजवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक, नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर पालिकेनेही खड्डे दुरुस्तीचे काम दर्जेदार होण्यासाठी कंबर कसली आहे. यामध्ये निकृष्ट काम केल्यास रोख दंड, काळ्या यादीत टाकणे आणि पालिका नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
खड्डे बुजले वाहतूक सुसाट, पालिकेचे मत
रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ‘रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट’ तंत्रज्ञानात केमिकल व डांबराचा वापर करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे वाहनांच्या टायरला रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट चिकटत नाही. तसेच खड्डा बुजवल्यानंतर पुढील १५ मिनिटांतच या रस्त्यावरून वाहतूक सुरू करता येणार आहे. पाऊस सुरू असतानाही या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. तर ‘रॅपिड हार्डनिंग काँक्रिट’ तंत्रज्ञानात खड्डा बुजवण्यासाठी सिमेंट, काँक्रिटसाठी लागणारे खड्डीसारखेच साहित्य आणि पॉलिमर वापरण्यात येते. मोठे खड्डे भरण्यासाठी याचा उपयोग होतो. यामध्ये अवघ्या सहा तासांत वाहतूक सुरू करता येते. खड्डे वर्षानुवर्षे मजबूत राहतात.