उड्डाणपुलाचे लोकार्पण होण्याआधीच श्रेयवाद रंगला, भाजप-शिवसेना यांच्यात बॅनरबाजी

या गोंधळातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले
उड्डाणपुलाचे लोकार्पण होण्याआधीच श्रेयवाद रंगला, भाजप-शिवसेना यांच्यात बॅनरबाजी

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणाऱ्या, बोरिवली पश्चिमेकडील आर. एम. भट्टड मार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण होण्याआधीच श्रेयवादस रंगला. शनिवारी पर्यावरणमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडण्याआधी भाजप-शिवसेना यांच्यात बॅनरबाजी, घोषणाबाजी पहायला मिळाली. या गोंधळातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले.

लोकार्पणप्रसंगी माजी आमदार तथा म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार सुनील राणे, आमदार विलास पोतनीस, आमदार मनिषाताई चौधरी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्ष संध्या दोशी-सक्रे, उपआयुक्त (परिमंडळ ७) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) अशोक मिस्त्री, आर/मध्य विभागाचे सहायक आयुक्त जावेद वकार, विविध माजी नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.

थेट वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणार!

आर. एम. भट्टड मार्गावर बोरिवली (पश्चिम) मधील लिंक रोड ते फिल्डमार्शल करिअप्पा उड्डाणपुलापर्यंत बांधण्यात आलेला हा उड्डाणपूल प्रामुख्याने लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग म्हणजेच वेस्टर्न एक्स्प्रेसवे यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या उड्डाणपुलामुळे शामाप्रसाद मुखर्जी चौक, कल्पना चावला चौक, साईबाबा नगर, राजेंद्र नगर आणि जवळपासच्या भागातील वाहतुकीला मदत होणार आहे. स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन आणि कल्पना चावला चौक या दोन महत्त्वाच्या जंक्शनवरुन हा पूल विस्तारित झाला असल्याने वाहतुकीचा वेग तर वाढणार आहेच सोबत प्रवासाच्या वेळेतही बचत होणार आहे.

दुचाकी घसरणार नाही याची काळजी!

या उड्डाण पुलावर अँटी स्किड सर्फेसिंग तंत्रज्ञान वापरून पृष्ठभाग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पुलावरून जाणारी वाहने विशेषतः दुचाकी घसरणार नाहीत, याची काळजी घेतली गेली आहे. उड्डाणपुलासाठी १३ हजार ३४७ घन मीटर काँक्रिट, २ हजार ९०० मेट्रिक टन रिइन्फोर्समेंट स्टील, तर ४ हजार १८६ स्ट्रक्चरल स्टील वापरण्यात आले आहे. या प्रकल्पावर सुमारे १७३ कोटी रुपये खर्च झाला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in