
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र होणारच नाहीत, मात्र अपात्र झाले तरीही तेच मुख्यमंत्री राहतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी प्रसंगी एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेवर निवडून आणू, पण तेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असे सांगितल्याने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा व्हिडीओ प्रसारित झाला होता. काही वेळातच तो डिलिटही करण्यात आला. त्यामुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी अटकळ लढवली जात होती. त्या चर्चांना पूर्णविराम देताना फडणवीस म्हणाले, ‘‘एकनाथ शिंदे हे अपात्र होणारच नाहीत. तरीही आमच्याजवळ अशी संख्या आहे, ज्यामुळे कुणीही अपात्र झालं तरी आम्हाला काही अडचण नाही. पण, आम्ही कायद्याच्या चौकटीत बसून काम केलं आहे. कुठेही कायद्याची चौकट तोडली नाही. जे काही केलंय ते कायदा पाहून आणि नियमांत बसेल असंच केलं आहे. त्यामुळे आम्हाला काहीही भीती नाही. भाजपला ‘प्लॅन बी’ची गरजच नाही. आमच्याकडे केवळ ‘प्लॅन ए’ आहे, तो ‘प्लॅन ए’ म्हणजे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील आणि ते अपात्र होणार नाहीत. याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, कारण आम्ही कायद्याचा अभ्यास केला आहे.”
मागच्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. त्याबाबतची सुनावणीदेखील आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत यासंबंधीचा निर्णय लागू शकतो. या पार्श्वभूमीवर काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह संबंधित आमदार अपात्र ठरतील आणि मुख्यमंत्री पदावर इतर नेत्याची वर्णी लागेल, असा दावा विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. या सर्व चर्चेवर फडणवीस यांनी आपली मोर्चेबांधणी काय आहे, हे सांगितली.
प्रदेश भाजपच्या ‘मी पुन्हा येईन’ या ट्विटमुळे शुक्रवारी उडालेल्या गोंधळावर सारवासारव करताना कुणाला जर यायचे असेल तर तो व्हिडीओ टाकून येतो का, असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आम्ही सगळे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
४ खासदारवाल्यांचा धसका कोण घेईल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सद्य राजकीय परिस्थितीचा धसका घेतल्याचा टोला शरद पवार यांनी लगावला होता. याबाबत बोलताना फडणवीस यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली ३०५ खासदार निवडून येतात, त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली ४ खासदार निवडून येतात त्यांचा धसका घेतला, असे बोलणे चुकीचे आहे, असा टोला शरद पवार यांना लगावला.
मी ब्राह्मण म्हणून टार्गेट केलं जातंय
फडणवीस यांनी मराठा आंदोलनावरून आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘‘मराठा समाजाच्या नावाने ज्या नेत्यांनी राजकारण केलं, त्यांनी मराठा समाजासाठी काहीही केलं नाही. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मी दिलं होतं. आजवर मराठा समाजासाठी जे लोक काहीही करू शकले नाहीत, असेच लोक मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. शेवटी मी माझी जात बदलू शकत नाही. मराठा समाजाच्या नावाने ज्यांनी राजकारण केलं, त्यांना वाटतं की मी सॉफ्ट टार्गेट आहे. म्हणून मला टार्गेट केलं जातंय, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.