मुंबई : मुंबई पोलीस दलातील आजी-माजी आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाने एका इंजिनिअर महिलेची सुमारे सहा लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपीस वनराई पोलिसांनी अटक केली. फैजल अब्दुल गफुर शेख असे या आरोपीचे नाव असून, फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत इतर दोन ते तीन आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
३१ वर्षांची तक्रारदार महिला ही इंजिनिअर असून एका खासगी कंपनीत उपाध्याक्ष म्हणून काम करते, तर तिचे पती मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात. तिचे वर्क फ्रॉर्म होम असून, महिन्यांत तीन ते चार वेळा ती तिच्या कंपनीत जाते. मंगळवारी ती कंपनीत असताना तिला एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्याने तो फेडेक्स इंटरनॅशनल कुरिअर सर्व्हिस कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तिचा आधारकार्ड क्रमांक सांगितला. हा आधारकार्ड तुमचाच आहे ना, असे सांगून त्याने तिच्याविरुद्ध आधारकार्डचा गैरवापर केल्याप्रकरणी एनसीबी कार्यालयात तक्रार केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने एनसीबी कार्यालयात कॉल फॉरवर्ड केला होता. यावेळी समोरील व्यक्तीने तो प्रदीप सावंत असल्याचे सांगून तिला तिचे आधारकार्ड पाठविण्यास सांगितले. त्यामुळे तिने त्याला तिचे आधारकार्ड पाठवून दिले होते. त्यानंतर प्रदीप सावंतने आमचे डीसीपी साहेब मिलिंद भारंबे यांच्याशी बोला, असे सांगितले. या व्यक्तीने मिलिंद भारंबे नावाचे सायबर सेल विभागाचे एक ओळखपत्र पाठविले होते. त्यामुळे तिला त्याच्यावर विश्वास बसला होता. त्यानंतर त्याने तिला तिच्या बँक खात्यातून काही रककम पाठविण्यास सांगून तिचे अकाऊंट कायदेशीर आहे की नाही, याबाबत पाहणी करायची आहे, असे सांगितले.
त्यामुळे तिने तिच्यासह तिच्या भावाच्या खात्यातून त्यांना ५ लाख ८५ हजार रुपये पाठवून दिले होते. रात्री घरी आल्यांनतर तिने हा प्रकार तिच्या वकिल असलेल्या पतीला सांगितला. यावेळी तिच्या पतीने तिला कुठलाही पोलीस अधिकारी फोनवरुन पैसे पाठवायला सांगत नाही. तिची कोणीतरी फसवणूक केली असून, तिला त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने वनराई पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगून तिथे संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी तोतयागिरीसह फसवणूक करणे व आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगांचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना गेल्या दोन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या फैजल शेख याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला असून, त्याने त्याच्या इतर सहकाऱ्यांची नावे पोलिसांना सांगितली आहेत. त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर फैजलला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.