मुंबई : आर्थर रोड कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला वर्षापूर्वी धमकावल्या आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे अखेर आरोप निश्चित केले. कथित भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कदम यांची आर्थररोड कारागृहात रवानगी करण्यात आली. वैद्याकिय उपचारासाठी आपल्यासोबत रुग्णालयात जाण्यासाठी सुरक्षारक्षक उपलब्ध नसल्यामुळे कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला तुरुंग अधीक्षक कार्यालयात शिवीगाळ केली होती आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी डॉक्टरांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलीसांनी कदम यांच्या विरोधात आरोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी जामीनावर नुकतीच सुटका झालेले कदम न्यायालयात हजर होते. न्यायालयाने कदम यांच्या विरोधात भादवि कलम ३५३ , ५०४ आणि ५०६ आदी कलमांतर्गत आरोप निश्चित केले.