मुंबईत नेमके भटके कुत्रे किती? आकडा लवकरच येणार समोर, पाळीव प्राण्यांचीही नोंदणी समजणार

मुंबईत भटक्या कुत्र्यांची नेमकी संख्या किती, यासाठी भटके कुत्रे व पाळीव प्राण्यांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबईत नेमके भटके कुत्रे किती? आकडा लवकरच येणार समोर, पाळीव प्राण्यांचीही नोंदणी समजणार

मुंबई : मुंबईत भटक्या कुत्र्यांची नेमकी संख्या किती, यासाठी भटके कुत्रे व पाळीव प्राण्यांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. पुढील १५ ते २० दिवसांत हा आकडा समोर येणार आहे. ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनल, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स आणि झिमॅक्स टेक सोल्यूशन्स यांच्या सहकार्याने पालिकेने ही मोहीम हाती घेतल्याचे महाव्यवस्थापक (देवनार पशुवधगृह) डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले.

मुंबई महानगरातील भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांची संख्या जाणून घेण्यासाठी तसेच प्राण्यांच्या जन्म नियंत्रणाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी पालिकेच्या वतीने १६ जानेवारीपासून मुंबईतील भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांची सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी मुंबईमध्ये सन २०१४ मध्ये भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याच धर्तीवर आता सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

भटक्या श्वानांचे सर्वेक्षण ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेकडून तर पाळीव प्राण्यांचे सर्वेक्षण यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स आणि झिमॅक्स टेक सोल्यूशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येईल. मुंबईतील भटके श्वान आणि पाळीव प्राण्यांच्या सध्याची वास्तविक संख्या या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेतली जाईल. तसेच २०१४ च्या संख्येसोबत त्याची तुलनात्मक मांडणी करण्यात येईल. त्याआधारे नेमक्या ज्या भागांमध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे, त्या ठिकाणांसाठी प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम आखून प्राणी कल्याण संस्थांच्या मदतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. या सर्वेक्षणातून प्राप्त स्थितीनुसार भटक्या श्वानांची सध्याची स्थिती आणि त्यात सुधारणा करण्याच्या अनुषंगानेही आवश्यक पावले उचलता येतील.

मुंबईसह सर्वच ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. काही ठिकाणी नागरिकांवर कुत्र्यांचे हल्लेही होत आहेत, त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. बऱ्याचदा झुंडीने असणाऱ्या कुत्र्यांमुळे रस्ता पार करणे नागरिकांसाठी आव्हान बनत चालले आहे. बहुतेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांसाठी आयते खाद्य मिळत असल्यामुळे त्यांची संख्या वाढू लागली आहे.

पाळीव प्राण्यांचीही नोंदणी समजणार

तसेच पाळीव प्राण्यांच्या सर्वेक्षणातून लोकांमध्ये नेमके कोणते पाळीव प्राणी पाळण्याचा कल आहे, हे समजेल. तसेच मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी आणि आरोग्य स्थितीही जाणून घेता येईल, असेही डॉ. पठाण यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in