झोपडपट्टीतल्या होतकरू तरुणाचे थेट ताजमध्ये चित्रप्रदर्शन!

टाटा समूहाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते २४ सप्टेंबर रोजी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
झोपडपट्टीतल्या होतकरू तरुणाचे थेट ताजमध्ये चित्रप्रदर्शन!

कलेला जातपात, गरीब- श्रीमंती माहित नसते. कलेतून फक्त आनंदाची देवाण-घेवाण करता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुलाबा येथील कफ परेडच्या मच्छिमार नगर झोपडपट्टीत राहणारा २९ वर्षीय निलेश मोहिते. बेताची परिस्थिती असल्याने अर्धवट शालेय शिक्षण घेणाऱ्या निलेशने आपल्या कलेच्या जोरावर चक्क ताज हॉटेल गाठले आहे. अनेक समस्यांवर मात करत निलेश मोहिते या होतकरू चित्रकाराचे थेट मुंबईतील जगप्रसिद्ध अशा ताज हॉटेलच्या आर्ट गॅलरीत चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले असून २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुलं असणार आहे. विशेष म्हणजे टाटा समूहाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पार पडणार आहे.

कुलाबा येथील कफ परेड मच्छिमार नगर झोपडपट्टीत निलेश मोहिते वास्तव्यास आहे. केवळ ९ वी पर्यंत शालेय शिक्षण घेणाऱ्या निलेश आणि त्याच्या बहिणीचा सांभाळ त्याच्या आईनेच केला. आई चार घरची धुणीभांडी करून आपला सांभाळ करत आहे याची जाण निलेशला होती. म्हणून आईला जास्त काम करावं लागू नये म्हणून निलेशने रात्रशाळेसोबतच वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट टाईम नोकरी केली. यावेळी तो आपल्या चित्रकलेच्या छंदापासून थोडाही भरकटला नाही. तो जेव्हा आणि जसा वेळ मिळेल तास तो आपला छंदही जोपासायचा. त्यातूनच त्याची चित्रं विकली जाऊ शकतात आणि त्यातून त्याचा उदरनिर्वाह बऱ्यापैकी चालू शकतो याची जाणीव त्याला झाली. अर्थात हा प्रवास एवढा सोपा नव्हता. या कठीण काळात निलेशला जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या मुंबई महासचिव ज्योतीताई बडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. निलेशचा आत्मविश्वास वाढवला. लोकांशी संपर्क कसा करावा, त्यांच्याशी संवाद कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये प्रदर्शनाची निश्चिती झाल्यावर चित्र काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू ज्योती बडेकर यांनी निलेशला उपलब्ध करून दिल्या. दरम्यान, झोपडपट्टीतील कमी शिकलेला, चित्रकलेचं कोणतंही प्रशिक्षण न घेतलेला परंतु उच्च प्रतिभेची नैसर्गिक देणगी लाभलेला तरुण आज मुंबईमधील कुलाबा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये आपले चित्रं प्रदर्शन भरवत आहे. अनेक उद्योगपती आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर या प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत ही विशेष बाब आहे.

रतन टाटांच्या मोठ्या रकमेचा चेक नाकारला

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा हे निलेशचे आदर्श. त्यांना भेटण्यासाठी निलेश सतत ताज हॉटेलच्या प्रवेशद्वारावर उभा रहायचा. अखेर एक दिवस रतन टाटा यांनी त्याला पाहिलं आणि बोलावून घेतलं. त्यावेळी रतन टाटा यांचं विमानात चढतानाचं एक चित्र रतन टाटा यांना निलेशने भेट म्हणून दिलं. या तरुणाची कला पाहून टाटा प्रभावित झाले. त्याच्याशी बोलताना त्याची बिकट परिस्थिती रतन टाटा यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला मोठ्या रकमेचा चेक देऊ केला आणि ‘या पैशातून मोठं घर घे,’ असं म्हणाले. पण भेटवस्तू म्हणून दिलेल्या चित्राचे पैसे घेणं निलेशला मान्य नव्हतं म्हणून निलेशने तो चेक नम्रपणे नाकारला. त्याची नम्रता पाहून रतन टाटांनी त्याला विचारलं की, ‘मग तुझ्यासाठी मी काय करू शकतो?’ त्यावर निलेशने चित्रप्रदर्शनासाठी जागा देण्याची आणि तुम्ही त्या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी मागणी केली. अर्थात ती मागणी लगेच मान्य झाली. म्हणूनच येत्या २४ सप्टेंबरपासून निलेश मोहितेच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईमधील कुलाब्याच्या ताजमहाल पॅलेस हॉटेलच्या गॅलरीत पार पडत आहे.

logo
marathi.freepressjournal.in