
मुंबई : एमएमआरडीएला वरळी-शिवडी कनेक्टर पूल बांधायचाय आणि त्याकरिता आधी संपूर्ण विस्तारित टिळक पूल बांधून मगच एलफिन्स्टन पूल पाडण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केली जात आहे.
वरळी-शिवडी कनेक्टरहून एक रस्ता परळ पूर्वेस खाली सोडण्याची सोय नाही. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची भीती आहे. आजचा प्रभादेवी पूल हादेखील एक छोटा म्हणजेच ४ लेनचा पूल आहे. प्रस्तावित केन्क्टरही ४ लेनचाच आहे. मग ह्यात प्रगती कसली? यात आजच्या वाढीव आणि भविष्यातील अधिक वाढीव होऊ घातलेल्या ट्रॅफिकचा विचारच केलेला दिसत नाही. तेव्हा रुग्णवाहिकेला जायला एक जोड रस्ता नाही. त्याचबरोबर वाढीव ट्रॅफिक मार्गस्थ करण्याची क्षमता नाही, अशा त्रुटी प्रस्तावित कनेक्टरमध्ये आहेत. सरकारने सर्वप्रथम ‘न्यू टिळक ब्रिज’ बांधायला हवा. तो जनतेस खुला केल्यावर त्यांनी जुना म्हणजेच आताचा टिळक ब्रिज नव्याने बांधायला हवा आणि हे दोघेही एकमेकास पूरक असे पूल जनतेस सादर केल्यानंतर सरकारने वरळी-शिवडी कनेक्टर बांधायला हवा. या योजनेमुळे परळ पूर्वेची वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. विद्यमान रस्त्यांची रचना पूर्व-पश्चिमेस अशी आहे की एकही माणूस त्याच्या घरातून विस्थापित होत नाही.
दुसऱ्या स्तरावर खालच्यांच्या उलट, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा एकतर्फी आणि ४ लेनचा पूल बांधू. पण मात्र हा पूल पश्चिमेस तीन रस्त्यांच्या एकत्रित येण्याने तयार होतो. उत्तरेहून सेनापती बापट मार्गावरून, पश्चिमेकडून रहिमतुल्लाह सयानी रोडवरून, आणि दक्षिणेतून स. ल. मटकर मार्गावरून आलेल्या तीन चढणीच्या एकत्रीकरणाने तयार होऊन हा पूर्वेस रेल्वे आणि आंबेडकर रोडच्या पलीकडे जेरबाई वाडिया रस्त्याच्या मध्यभागी जाऊन उतरतो.
सेव्ह परळ आराखडा
द्विस्तरीय पुलाऐवजी एक त्रिस्तरीय पूल बांधण्याचा प्रस्ताव प्रभंजन कात्रे यांनी सुचविला आहे. त्यानुसार सर्वप्रथम आपण परळ पूर्वेचा म्हणजेच परळ टी टीचा आंबेडकर रोडवरील उत्तर दक्षिण पूल काढून टाकू. आचार्य दोंदे मार्गावरून सर्वात खालील उड्डाणपूल बांधू. हा उड्डाणपूल ४ लेनचा पूर्वेहून पश्चिमेकडे एकतर्फे जाणाऱ्या ट्रॅफिकचा असेल. असे करताना आंबेडकर रोडवरील उत्तर दक्षिण ट्रॅफिक हे जमिनीवरून जाईल. हा सर्वात खालील स्तरीय उड्डाणपूल रेल्वेच्या डोक्यावरून पश्चिमेस आजचा प्रभादेवी पूल जेथे उतरत/ चढत आहे, तेथेच उतरेल.
सर्वाधिक फायदा
आजचा प्रस्तावित कनेक्टर हा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, जणूकाही त्याचा खालच्यांशी काहीही संबंध नसल्यासारखा जातो. तृतीय स्तरावरून येणाऱ्या कनेक्टराला एक दक्षिणेस उतरणारा जोडपूल बांधून
त्यास ह्या मध्येच तोडलेल्या एल्फिन्स्टन पुलावर नेऊन सोडता येईल. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या ट्रॅफिकला मध्य मुंबईतच खाली उतरता येईल आणि त्याला पश्चिमेकडील दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याची आवश्यकता राहणार नाही. हे नवीन जोडरस्ते, नव्हे जोडपूल प्रस्तावित आराखड्यात असायला हवे.