विधानसभाच लढविणार देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

राज्य सरकार कसे चालले आहे याबाबत विचारले असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे भक्कम फलंदाज आहेत
विधानसभाच लढविणार देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Published on

मुंबई : मी विधानसभा निवडणूकच लढणार आहे. तीदेखील माझ्या नागपूर मतदारसंघातूनच, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणूक लढणार, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे उत्तर मुंबईतून लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावर आता पडदा पडला आहे. देशातील जनतेने तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांनाच संधी देण्याचे ठरविले असल्याचेही ते म्हणाले. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते बोलत होते.

देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी यांनाच विराजमान करण्याचा निश्चय केला आहे. त्यात आता कोणताही बदल होणार नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मी नागपूरमधूनच ती देखील विधानसभा निवडणूकच लढणार आहे. तसेच पुढील दहा वर्षांत तुमचा राजकीय प्रवास कसा असेल, असे पत्रकारांनी विचारले असता, राजकारणात पुढे काय होते, हे भाकित करता येत नाही. मात्र, दहा वर्षांनी देखील मी भाजपसाठीच काम करत असेन आणि पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी निश्चितच पार पाडेन,’’ असेही ते म्हणाले.

महापालिका निवडणुका कधी होणार याबाबत विचारले असता, ‘‘हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आम्हालाही निवडणुका हव्याच आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमधील आमच्या यशाचे प्रतिबिंब निश्चितच या निवडणुकांत पडेल, असा आम्हाला विश्वास असल्याचे फडणवीस म्हणाले. दिवाळ सणानिमित्त शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. त्याबाबत फडणवीस म्हणाले, राजकारण आणि कौटुंबिक नाती ही वेगवेगळी असतात. या भेटीमुळे हेच स्पष्ट झाले. अशी कौटुंबिक भेट झाल्याचा आपल्याला आनंदच झाला, असेही फडणवीस म्हणाले. राजकारणात कटुता नकोच. महाराष्ट्रातही ती नाही. फक्त चार-पाच व्यक्ती सोडल्या, त्यांची वक्तव्ये सोडली तर महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेही कटुता उरेल असे मला वाटत नसल्याचेही फडणवीस म्हणाले.

मी भक्कम विकेटकिपर

राज्य सरकार कसे चालले आहे याबाबत विचारले असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे भक्कम फलंदाज आहेत. मी चांगला विकेटकिपर आहे. त्यामुळे सरकारला कसलीही अडचण नसल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in