क्लिअरिंग एजंटकडे खंडणीची मागणी

काम फसल्यामुळे दोघांमध्ये आर्थिक मुद्द्यावरून वाद सुरू झाला जीवे मारण्याची धमकी दिली गेली
क्लिअरिंग एजंटकडे खंडणीची मागणी

मुंबई : व्यावसायिक वादातून एका क्लिअरिंग एजंटकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी कुणाल गुलाठी या व्यावसायिकाविरुद्ध पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. कुणालने आतापर्यंत तक्रारदाराकडून १३ लाख १५ हजार रुपये घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. क्लिअरिंग एजंट विजय मिश्रा यांची तीन वर्षापूर्वी कुणाल गुलाठीशी ओळख झाली होती. एकदा चीनमधील माल क्लिअर करून देण्याचे कुणालचे काम मिश्रा यांनी केले होते. त्यानंतर कुणालने दिलेले आणखी एका काम मिश्रा यांनी अन्य व्यक्तीकडून करवून घेतले होते. मात्र ते काम फसल्यामुळे दोघांमध्ये आर्थिक मुद्द्यावरून वाद सुरू होते. त्यातच कुणालने विजय मिश्रा यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले होते. त्यातच विजय मिश्रा यांना पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांच्या मुलाने खंडणी मागणाऱ्या कुणालविरुद्ध कुणालविरुद्ध पंतनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर कुणालविरुद्ध पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in