
मुंबई : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका वयोवृद्धाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडे तीस लाखांची खंडणी मागणी करण्यात आल्याचा प्रकार नागपाडा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह चौघांविरुद्ध नागपाडा पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. त्यात कुसूम आसिफ खलिफा, जानकी प्रदीपभाई चावडा व इतर दोघांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. ६२ वर्षांचे वयोवृद्ध मालाड येथे राहत असून, जून महिन्यांत ते त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी गावी गेले होते. यावेळी त्यांची कुसूमशी ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर नंतर मैत्रीत झाले होते. गावाहून मुंबईत येताना ते दोघेही एकत्र ट्रेनमधून आले होते. मंगळवारी, १८ जुलैला या दोघींनी त्यांना ग्रॅटरोड येथील आनंद गेस्ट हाऊसमध्ये बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर रुम क्रमांक २०४ मध्ये कुसूम आणि जानकी होती. ते गेल्यानंतर जानकी तेथून निघून गेली. त्यानंतर तिने तिचे कपडे काढून त्यांनाही कपडे काढण्यास प्रवृत्त केले. याच दरम्यान तिथे दोनजण आले. त्यांनी त्यांना धमकी देऊन तीस लाखांची मागणी केली. त्यांचे अश्लील फोटो त्यांच्याकडे असून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण केली.