मुंबईत डोळ्यांची साथ; नेत्र संसर्ग बाधित रुग्णांवर उपचार सुरु

पावसाळ्यात हवेतील दमटपणा वाढला की, वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक ठरते.
मुंबईत डोळ्यांची साथ; नेत्र संसर्ग बाधित रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईत डोळ्यांची साथ आली असून, रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मागील १५ दिवसांत मुंबई महापालिकेच्या मुरली देवरा रुग्णालयात २५० ते ३०० नेत्र संसर्ग बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि त्रास जाणवल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांकडून सल्ला व औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

पावसाळ्यात हवेतील दमटपणा वाढला की, वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक ठरते. त्यामुळे दरवर्षी या दिवसांत इतर आजारांबरोबर नेत्रसंसर्ग अर्थात डोळे येण्याची साथ पसरते. नेत्र संसर्गाच्या साथीमध्ये सुरुवातीला एका डोळ्याला संसर्ग होतो, त्यानंतर दुसऱ्या डोळ्यालादेखील संसर्ग होतो. डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटते आणि सतत डोळ्यांमधून पाणीदेखील येते. डोळे लाल होतात. सुरुवातीला ही लक्षणे एका डोळ्यास जाणवतात व त्यानंतर दुसऱ्या डोळ्यालादेखील जाणवतात. काही वेळा डोळ्यातून चिकट द्रव पदार्थ बाहेरील बाजूस येत असतो. तसेच डोळ्यांना आतील बाजूस सूज येते. डोळ्यांना खाज येते. डोळे जड वाटतात आणि तीव्र प्रकाश सहन होत नाही. या प्रकारच्या संसर्गामुळे काही लोकांना तापदेखील येतो. सध्या या साथीचे कारण विषाणूजन्य असल्याचे मुंबई महापालिकेच्या मुरली देवरा नेत्र रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी वर्षा रोकडे यांनी सांगितले.

अशी काळजी घ्यावी!

डोळे आले असतील डोळ्यांना सतत हात लावू नये

डोळ्यांना स्वच्छ पाण्याने वारंवार धुत राहावे

डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा वापर करावा

डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नये

कुटुंबातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून नेत्र संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून सुरक्षित अंतर राखून राहावे.

घरगुती उपाय न करता, वैद्यकीय तज्ज्ञांचा / नेत्र उपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in