सेंट जॉर्जमध्ये डोळे, प्लॅस्टिक सर्जरीचा विभाग लवकरच

सेंट जॉर्जेस रुग्णालय संपूर्णतः कोविड झाल्यानंतर या ठिकाणी असलेले सर्व विभाग बंद करण्यात आले
सेंट जॉर्जमध्ये डोळे, प्लॅस्टिक सर्जरीचा विभाग लवकरच

जेजे रुग्णालय समूहाच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयात कोविडनंतर अनेक सेवा बंद आहेत. त्यामुळे रुग्णांना सेवा मिळणे अवघड झाले असले तरी आता टप्प्याटप्प्यात एकेक विभाग सुरू करण्यात येत आहेत. सध्या बंद असलेला डोळे आणि प्लॅस्टिक सर्जरीचा विभागदेखील लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

सेंट जॉर्जेस रुग्णालय संपूर्णतः कोविड झाल्यानंतर या ठिकाणी असलेले सर्व विभाग बंद करण्यात आले. तसेच सुरू असलेले विभाग फक्त कोविड रुग्णांसाठी सुरू होते. त्यानंतर कोविडचे प्रमाण कमी झाल्यानंतरही या रुग्णालयावरचा कोविडचा शिक्का काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या रुग्णालयातील सर्व विभाग आजतागायत बंद आहेत. त्यामुळे आता हे रुग्णालय पूर्ण ताकदीनिशी सुरू करण्यासाठी जेजे रुग्णालय समूहाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सेंट जॉर्जेस रुग्णालयाचेही यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. येत्या १० दिवसात रुग्णालयातील नेत्र विभाग आणि प्लास्टिक सर्जरी विभाग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी डॉक्टरांची टीम सज्ज झाली आहेत. त्यात डोळ्यांच्या विभागासाठी एक असोसिएट प्रोफेसर आणि एक निवासी डॉक्टर तर प्लॅस्टिक सर्जरीसाठी एक निवासी डॉक्टर अशी टीम असणार आहे. त्यासोबत ओपीडी आणि ओटीसाठी पाच तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in