स्तनदा मातांच्या सुरक्षेसाठी ममता कक्ष ; मध्य रेल्वेच्या ७ स्थानकांवर सुविधा; सीएसएमटी स्थानकात कक्ष सुरू

उपनगरीय रेल्वेमार्गावरील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर स्तनदा मातांसाठी विशेष कक्षांची सुरुवात करण्यात आली आहे
स्तनदा मातांच्या सुरक्षेसाठी ममता कक्ष ; मध्य रेल्वेच्या ७ स्थानकांवर सुविधा; सीएसएमटी स्थानकात कक्ष सुरू

बाळाची शारिरिक व मानसिक रितीने योग्य वाढ होण्यासाठी आईचे दुध अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र रेल्वे स्थानके, एसटी बसस्थानके अन्य सार्वजनिक ठिकाणी आजूबाजूच्या गर्दीमुळे बाळांना स्तनपान करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत अनेक सामाजिक संस्थांनी, महिला प्रवाशांनी सूचना केल्यानंतर मध्य रेल्वेने महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नववर्षात रेल्वेस्थानकात बाळाला स्तनपान करणे मातांना शक्य व्हावे यासाठी मध्य रेल्वेकडून ७ स्थानकांत १३ ठिकाणी ‘ममता कक्ष’ उभारण्यात येत आहेत. नॉन फेअर रेव्ह्युन्यू (एनएफआर) अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला असून मेसर्स बुलस आय मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला हे कंत्राट देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

नवजात अथवा लहान बाळासह बाहेर असताना, प्रवासादरम्यान हा अनुभव सुखद नसतो याचा अनुभव ७० टक्के भारतीय मातांनी एका सर्वेक्षणामध्ये नोंदवला आहे. ऑगस्ट महिन्यात १ ते ७ ऑगस्टच्या ‘स्तनपान सप्ताहा’निमित्ताने हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यानंतर महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणाऱ्या अनेक अडचणी समोर आल्या. त्यामुळे रेल्वे स्थानके, एसटी बस स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी महिलांना स्तनपान करता यावे याबाबत विशेष सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना काही सामाजिक संस्था, महिला प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे, एसटी महामंडळाकडे केल्या.

उपनगरीय रेल्वेमार्गावरील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर स्तनदा मातांसाठी विशेष कक्षांची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र त्याचे व्यवस्थापन सांभाळले जात नसल्याने या जागा आईसाठी सुरक्षित व आरामदायी नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्तनपानाच्या दृष्टीने सुरक्षित असलेल्या जागांची निर्मिती करायला हवी अशी मागणी महिला प्रवाशांकडून वारंवार करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर स्तनदा मातांच्या तक्रारी आणि सूचना रेल्वेला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यासाठी ‘ममता कक्ष’ सुरू करण्याची प्रक्रिया मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आली आहे.

या गर्दीच्या स्थानकांवर उभारण्यात येणार ममता कक्ष

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, लोणावळा, पनवेल, ठाणे, मुलुंड या महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांत एकूण १३ ममता कक्ष उभारण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज येथे कक्ष उभारण्यात आले असून इतर ठिकाणी देखील ममता कक्षाचे काम सुरु आहे. हा प्रकल्प नवीन आणि नाविन्यपूर्ण भाडे व्यतिरिक्त (नॉन फेअर) रेव्हेन्यू आयडियाज स्कीम अंतर्गत करण्यात आला आहे. हे कंत्राट मेसर्स बुलस आय मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले असून २७ डिसेंबर २०२२ च्या स्वीकृती पत्र अंतर्गत ६० हजार रुपये प्रति नर्सिंग पॉड आणि २ वर्षांचा करार कालावधी करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in