
मुंबई : कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही. यासंदर्भात राज्य सरकार आणि महानगरपालिकेने उच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. यासंदर्भात पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कंट्रोल फीडिंग करा, तांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्याचे तसेच कबुतरांमुळे होणारा श्वसनाचा त्रास, विष्ठेमुळे होणारे प्रदूषण याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून तज्ज्ञांच्या मदतीने अहवाल सादर करा, असे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर उच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कबुतरखान्यांवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रालयात तातडीची बैठक आयोजित केली होती.
याप्रकरणी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेवर सुनावणी सुरू असून राज्य सरकार व मुंबई महापालिका आपली बाजू मांडेल. तसेच गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयातही भूमिका मांडण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुंबई महापालिकेला पक्षीगृह उभारण्याची व त्याची देखभाल करण्याची सूचनाही फडणवीस यांनी यावेळी केली.