विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव विधानसभा सभागृहात मांडताना पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत मंत्री नवाब मलिक यांचे गुन्हेगारी विश्वाशी संबंध असल्याचे सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावर बोलताना फडणवीस यांनी गुरुवारी अनेक कागदपत्रे सादर करीत अंडरवर्ल्डशी सरकारमधील लोकांचे संबंध असल्याचे सांगितले.
ही तर महाविनाश आघाडी,
मद्य विक्री आघाडी!
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच विंदा करंदीकर यांच्या कवितेच्या ओळी त्यांनी उद्धृत केल्या. मविआ शब्दाची फोड करताना फडणवीसांनी राज्य सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. मविआ म्हणजे महाविकास आघाडी असे समजत होतो, पण आता लक्षात आले की ही ‘महाविनाश आघाडी’ आहे. नंतर समजले की ही ‘महावसुली आघाडी’ आहे. पण अलिकडच्या काळात ही ‘मद्य विक्री आघाडी’ झाली आहे. किती दूरचा विचार करून तुम्ही त्या वेळी मविआ नाव ठेवले. कारण पेट्रोल-डिझेलचा कर कमी न करता दारू विक्रीचा कर कमी केला. कोरोनाच्या काळात मंदिरे बंद, तर मदिरालये सुरू, क्लास बंद आणि ग्लास सुरू असले प्रकार या सरकारच्या काळात सुरू आहेत,’ असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकायला मिळाले ही खरे तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट होती. छोटे का होईना, परंतु मुख्यमंत्र्यांचे भाषण आम्हाला ऐकायला मिळाले, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
कुख्यात दाऊद इब्राहिम याच्यासाठी मनी लॉंड्रिग करणारे अली हसन, त्याचा सहकारी शफिक अन्सारी, एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या कारनाम्यांचे पुरावे त्यांनी सभागृहात सादर केले. त्याचबरोबर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याचा तपास थांबवण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
कुख्यात दाऊदच्या मनी लॉंड्रिग करणाऱ्या अन्य हस्तकांचाही फडणवीस यांनी यावेळी सभागृहात उल्लेख केला. अनेक जण बंगाली नागरिक असून बनावट कागदपत्रांच्या आधारे देशात राहत असून दाऊदचे हवाला आणि अन्य आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
‘या सर्व व्यक्ती या एका प्रोफेशनल गँगच्या सदस्य असून त्यात ३०० पेक्षा जास्त सदस्य आहेत, तसेच ते ८ राज्यात काम करीत आहेत. केवळ हवाला आणि मनी लॉंड्रिग व्यतिरिक्त नार्कोटिक्स आणि सेक्स ट्रॅफिकिंग यातही हे लोक काम करतात. टेरर फडिंगचाही संशय आहे. आयसीसच्याही काही संपर्कात आहेत. त्यामुळे हा गंभीर मुद्दा असून देशाच्या सुरक्षेचा प्रश्न यात असल्याने याचा तपास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे (एनआयए) दिला पाहिजे,’अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.
‘जिथे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेथे आम्ही देशाला प्राधान्य देतो. त्यामुळेच मलिक यांच्यासारख्या मंत्र्यांचे गुंडांशी संबंध असतानाही त्यांचा राजीनामा न घेणे ही गंभीर बाब आहे,’ असे फडणवीस यावेळी म्हणाले. फडणवीस यांचे भाषण संपताच भाजपच्या सदस्यांनी सभागृहात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची घोषणा देण्यास सुरुवात केली.