

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांची सत्ता होती त्यावेळी महापौर पद असो स्थायी समिती ठाकरे यांनी ते आपल्याकडे ठेवले होते. त्यामुळे मिठी नदीतील भ्रष्टाचार असो वा कोविड काळात केलेला भ्रष्टाचार, महानगरपालिकेत ४० हजार कोटींचा घोटाळा झाला आणि पैसा घरी घेऊन गेले, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. गेली १५ वर्षे राज ठाकरे पालिकेतील भ्रष्टाचारावर बोलत आले असून आता यांचा जीव मुंबईत अडकलाय आणि मुंबई महानगरपालिका ताब्यात घेत भ्रष्टाचार करायचाय, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केला.
पालिकेतील यांच्या भ्रष्टाचारावर चित्रपट प्रदर्शित होईल, असा टोला फडणवीस यांनी लगावला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर आरोप केले.
नगर परिषद, पंचायत समिती असो वा महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले तर हे टीका करतात. परंतु उद्धव ठाकरे स्वत: विधानपरिषदेत बिनविरोध निवडून आले आहेत. तेव्हा लोकशाही कुठे गेली होती, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
गेल्या काही दिवसांपासून मराठीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. जर ते मराठी असतील तर मी काय उत्तर प्रदेशातून आलो आहे का? विधानसभा निवडणुकीत भाजप हा मुंबईत १५ ते १६ जागा जिंकणारा पक्ष आहे. आम्हाला मराठी लोकांची साथ नसती तर आम्ही या जागा जिंकू शकलो असतो का? मी नागपूरमधून आलो आहे. मी पाकिस्तानमधून आलेलो नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज आणि उद्धव ठाकरे यांना उत्तर भारतीयांबद्दल इतका आकस का आहे? सगळ्या हिंदूंनी एकत्र राहिले पाहिजे. मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र लढायला तयार आहोत. पण अन्य राज्यांमधील लोकांना मारहाण करण्याचे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
बुरखेवाली महापौर होईल, असे विधान वारिस पठाण यांनी केले, त्यावेळी ठाकरे बंधूंच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. हे सगळे वोटबँकेचे राजकारण आहे, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना लगावला.
आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. पाच वर्षांमध्ये विकासकामांसाठी १७ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईत फक्त बाळासाहेब ठाकरेच ब्रँड!
मुंबईत फक्त एकच ब्रँड आहे, तो म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही ब्रँड नाही, बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.