
गिरीश चित्रे/मुंबई
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी, अमराठी असा कोणताही वाद नाही. येथे मराठी, अमराठी एकत्र राहतात. मराठी, अमराठी दोघेही सुरक्षित असून काही जण उगीचच वाद निर्माण करतायत. मात्र, आगामी निवडणुकीत मराठी, अमराठी दोघेही त्यांना आपली जागा दाखवतील, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज व उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. मुंबईतील मतदार सुजाण असून मुंबईत महायुतीच बाजी मारणार, असा दावाही त्यांनी केला.
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवणार, असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. याच मुद्द्याचा धागा पकडून राज व उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीला जोरदार विरोध केला. अखेर राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर राज व उद्धव ठाकरे यांनी वरळीतील डोममध्ये विजयोत्सवाचे आयोजन केले आणि यावेळी २० वर्षांनंतर प्रथमच उद्धव व राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे राज व उद्धव ठाकरे यांची युती होणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीच्या मुद्द्यावरून राज व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महापालिका निवडणुकीनंतर ठाकरेंचे महाराष्ट्रातील राजकारण संपणार, असे भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले. निशिकांत दुबे यांनी अशी वक्तव्ये करण्याची गरज नाही. मुंबई, महाराष्ट्रातील परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. राज्यात मराठी, अमराठी दोघेही सुरक्षित असून गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून एकत्र नांदतायत. महाराष्ट्रात मराठी, अमराठी असा काही गैरसमज नसून काही जण हा वाद निर्माण करतायत. मराठी, अमराठी दोघेही निवडणुकीत त्यांना जागा दाखवतील. त्यामुळे निशिकांत दुबे यांनी यात पडू नये, असा सबुरीचा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुबे यांना दिला.
कबुतरखाना, नांदणीबाबत मंगळवारी बैठक
दादर येथील कबुतरखाना बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखाना ताडपत्रीने झाकला आहे. मात्र, याबाबत जैन समाज आक्रमक झाला आहे, तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील महादेवी हत्तीणीबाबतही न्यायालयाचा निर्णय आहे. तरीही कबुतरखाना आणि महादेवीबाबत मंगळवारी बैठक बोलावली आहे. तसेच या दोन्ही विषयांचा अभ्यास करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांना सल्ला
शिवसेनेचा बाप मीच आहे, असे वक्तव्य परिणय फुके यांनी केले. अलीकडच्या काळात वाक्य कापून दाखवणे, त्याच्यावर दिवस काढणे सुरू आहे. ते बंद करा. प्रसारमाध्यमांनी अर्धवट वाक्ये कापून गैरसमज निर्माण करणे बंद करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.