शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर फडणवीस यांचे रोखठोक मत, दसरा मेळावाबद्दल देखील केले वक्तव्य

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा निर्णय काय आहे हे मला माहीत नाही. त्यांचा मेळावा
शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर फडणवीस यांचे रोखठोक मत, दसरा मेळावाबद्दल देखील केले वक्तव्य
ANI

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या युतीची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या युतीचा फायदा कोणाला होणार? आणि महत्त्वाचे म्हणजे या युतीमुळे शिवसेनेच्या स्थितीत काय फरक पडणार आहे? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या युतीवर भाजप टीका करत असून, त्याचा शिवसेनेला फायदा होणार नसल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. त्यासोबतच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देण्याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "आम्ही सर्व शिवप्रेमी आहोत. या दुहीचा शाप महाराष्ट्राला गाडून टाकू आणि एकत्र नवा इतिहास घडवू, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीचे स्वागत केले आहे. मात्र, ‘उद्धव ठाकरेंसोबत आता कोणी युती करायला तयार नाही, त्यांची परिस्थिती अशी झाली आहे, अशा प्रकारची टीका भाजपकडून केली जात आहे. यावरून राजकारण तापू लागले असताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, नागपुरात देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी याबाबत विचारले असता त्यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले. फडणवीस म्हणाले आहेत की, "मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी".

राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेनेने या सभेची तयारी सुरू केली आहे. मात्र, याबाबत पोलिस प्रशासन काय निर्णय घेणार, याची चर्चा सुरू झाली आहे. "राज्य सरकार नियमबाह्य काहीही करणार नाही', अशी सूचक प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. "एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा निर्णय काय आहे हे मला माहीत नाही. त्यांचा मेळावा होणार आहे की नाही याची मला कल्पना नाही. गृहमंत्री या नात्याने आम्ही जे नियमात आहे तेच करू, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in