मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात नेण्याच्या चर्चांना आता पुस्ती मिळत आहे. फडणवीस यांनी पुढील वर्षी होणारी लोकसभेची निवडणूक नागपूरमधून लढवावी, असा आग्रह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने धरला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात तरुणांना संधी देणयाच्या हेतुने फडणवीसांना दिल्लीत नेण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी फडणवीस यांनी राज्यातच राहुन विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करावे, यासाठी फडणवीस समर्थक आग्रही आहेत.
गेल्या काही वर्षांत देवेंद्र फडणवीस हे राज्यात भाजपचा आश्वासक चेहरा म्हणून उदयास आले आहेत. त्यांचे पक्षातील विरोधक एकनाथ खडसे हे पक्षातूनच बाहेर केले तर पंकजा मुंडे यांनाही बाजूला करण्यात आले आहे. फडणवीस यांचे तिसरे विरोधक विनोद तावडे हे आधीच दिल्लीत पक्ष कार्यात कार्यरत आहेत. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या काळात त्यांनी राज्यात पक्ष संघटनही मजबूत करण्यावर भर दिला. मुख्य म्हणजे त्यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांच्यावर अन्याय केल्याची आधीच भाजपच्या एका गटाची भावना आहे. शिवसेना फोडण्यामध्ये फडणवीस यांची महत्वाची भूमिका असतानाही फडणवीस यांना डावलून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यावेळी फडणवीस यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत सरकारमध्ये सामील होणार नसल्याचे सांगितले होते. पण पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होतील, असे जाहीर केले. ‘‘फडणवीस यांच्याशिवाय विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणे, हा आत्मघात ठरेल,’’ असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.