

मुंबई : भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी)चा शास्त्रज्ञ असल्याचा बनाव करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात मुंबई गुन्हे शाखेने ६८९ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. मुख्य आरोपी अख्तर कुतुबुद्दीन हुसेनी आणि त्याचा सहआरोपी मुनज्जीर नझीमुद्दीन खान यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. खानने हुसेनीला तीन पासपोर्टसह अनेक बनावट कागदपत्रे तयार करण्यात मदत केली होती.
आरोपपत्रात बीएआरसीकडून मिळालेले एक पत्रही समाविष्ट असून ते सरकारी पक्षाच्या दाव्याला दुजोरा देते. हे आरोपपत्र भारतीय न्याय संहिता (बीएनसी) २०२३ अंतर्गत दाखल करण्यात आले आहे. यात तोतयागिरीद्वारे फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, न्यायालयीन नोंदी किंवा सार्वजनिक रजिस्टरची बनावट, मौल्यवान दस्तऐवज, वसीयत व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची बनावट, बनावट कागदपत्रे बाळगणे, बनावट कागदपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक नोंदी खऱ्या म्हणून वापरणे यांचा समावेश आहे. यात पोलिसांनी बनावट कागदपत्रे बाळगणे हा गुन्हा नव्याने आरोपपत्रात जोडला आहे.
बनावट नावाने दोन ओळखपत्रे
वर्सोवा येथे राहणारा मुख्य आरोपी अख्तर कुतुबुद्दीन हुसेनी ऊर्फ अलेक्झांडर पामर (६०) याला मुंबई पोलिसांनी १७ ऑक्टोबरला अटक केली होती. हुसेनी स्वतःला बीएआरसीचा शास्त्रज्ञ असल्याचे भासवण्यासाठी बनावट ओळखपत्रांचा वापर करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून दोन बनावट ओळखपत्रे जप्त केली असून एकावर त्याचे नाव अलेक्झांडर पामर व दुसऱ्यावर त्याचे नाव अली रेझा हुसेनी आहे. हुसेनीने बनावट पदव्या, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्डच्या आधारे पूर्णपणे खोटी ओळख तयार केली होती. ही कागदपत्रे त्याचा जमशेदपूरचा साथीदार मुनज्जीर नझीमुद्दीन खान (३४) याने तयार केल्याचा आरोप आहे.