Mumbai : तिकीट मागितलं, थेट CBI चं ओळखपत्र दाखवलं; लोकलच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या तोतयाचं बिंग फुटलं

दुपारी सुमारे १.२० वाजता तिकीट तपासनीस धनंजय यादव जीटीबी नगर रेल्वे स्थानकावर एका लोकल ट्रेनच्या पहिल्या श्रेणीच्या डब्यात नियमित तपासणीसाठी दाखल झाले. यावेळी संबंधित व्यक्तीकडे तिकीट मागितले असता त्याने...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : स्वतःला सीबीआयचा विशेष अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतील लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यातून विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचं बिंग तिकीट तपासणीदरम्यान फुटलं. ६२ वर्षीय व्यक्तीविरोधात वडाळा रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तिकीट मागितलं, थेट सीबीआयचं ओळखपत्र दाखवलं

एफआयआरनुसार, ३० डिसेंबर रोजी दुपारी सुमारे १.२० वाजता तिकीट तपासनीस धनंजय यादव जीटीबी नगर रेल्वे स्थानकावर एका लोकल ट्रेनच्या पहिल्या श्रेणीच्या डब्यात नियमित तपासणीसाठी दाखल झाले. यावेळी संबंधित व्यक्तीकडे तिकीट मागितले असता त्याने तिकिटाऐवजी थेट ओळखपत्र दाखवले. या ओळखपत्राच्या एका बाजूला सीबीआयचे चिन्ह तर दुसऱ्या बाजूला इंग्रजी आणि मराठीत ‘भारत सरकार’ असे कोरलेले होते. ओळखपत्र संशयास्पद वाटल्याने यादव यांनी इतर कागदपत्रांची मागणी केली. मात्र आरोपी कोणतेही वैध कागदपत्र सादर करू शकला नाही.

गुन्हा दाखल

यानंतर तिकीट तपासनीस यादव, रेल्वे पोलिस दलातील सचिदानंद सिंह आणि एका महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी अधिक चौकशी केली असता संबंधित व्यक्ती बनावट अधिकारी असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याची ओळख गोवंडी परिसरात राहणारा बदरुद्दीन खान अशी पटवली. या प्रकरणी बदरुद्दीन खानविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २०५ अंतर्गत (फसवणुकीच्या इराद्याने लोकसेवकाचा वेश धारण करणे किंवा फसवणुकीच्या उद्देशाने ओळखचिन्ह बाळगणे) आणि भारतीय रेल्वे कायदा व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वडाळा रेल्वे पोलीस करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in