व्ही.एन. देसाई रूग्णालयात बनावट डॉक्टर प्रकरण; कंत्राटदाराची आर्थिक देणी स्थगित

सांताक्रुझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील डॉक्टरचे बनावट शैक्षणिक पात्रता असल्याचे समोर आले. यावर पालिकेने कंत्राटदार संस्थेची आर्थिक देणी स्थगित करून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
व्ही.एन. देसाई रूग्णालयात बनावट डॉक्टर प्रकरण; कंत्राटदाराची आर्थिक देणी स्थगित
Published on

मुंबई : सांताक्रुझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील डॉक्टरचे बनावट शैक्षणिक पात्रता असल्याचे समोर आले. यावर पालिकेने कंत्राटदार संस्थेची आर्थिक देणी स्थगित करून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

व्ही. एन. देसाई रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील डॉक्टरांच्या नेमणुकीकरिता प्रशिक्षित आणि अर्हताप्राप्त मनुष्यबळ पुरवण्यासाठी 'साई संजीवनी' या संस्थेसोबत करार केला होता. या करारान्वये रुग्णालयातील सेवांच्या अनुषंगाने पुरेशी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या वैद्यकीय सेवा क्षेत्रातील मनुष्यबळाचा पुरवठा करण्याची जबाबदारी या संस्थेची होती. करारामधील अटी व शर्तींनुसार राज्य वैद्यकीय परिषद आणि राष्ट्रीय वैद्यकीय परिषद या संस्थांकडे डॉक्टरांची नोंदणी झालेली असणे गरजेचे आहे.

मुंबई महापालिकेकडून कंत्राटदार संस्थेमार्फत नेमण्यात आलेल्या वैद्यकीय मनुष्यबळाच्या शैक्षणिक पात्रतेशी संबंधित कागदपत्रे ही पडताळणीसाठी फेब्रुवारी २०२५ या महिन्यात महाराष्ट्र वैद्यकीय परिषद संस्थेकडे पाठवण्यात आली होती. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेल्या अभिप्रायानुसार माहिती मागविण्यात आलेल्या डॉक्टरशी संबंधित कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. कंत्राट प्रक्रियेत या डॉक्टरांनी सादर केलेले प्रमाणपत्रही महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने अवैध ठरविले आहे.

त्यानुसार, साई संजीवनी या संस्थेविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

संस्थेविरोधात कठोर कारवाई सुरू

पालिकेच्या रुग्णालयात बनावट डॉक्टरांच्या नेमणुकीला परवानगी नाही. सदर कंत्राटदार संस्थेविरोधात कठोर कारवाई यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

logo
marathi.freepressjournal.in