बोगस विदेशी स्कॉच बनविणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; चार आरोपींना अटक, २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई शहरात बोगस विदेशी मद्य स्कॉच विक्री करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
बोगस विदेशी स्कॉच बनविणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; चार आरोपींना अटक, २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई : विदेशी स्कॉच या मद्य बनविणाऱ्या कारखान्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश करून चार आरोपींना अटक केली. नर्शी परबत बाभणिया, भरत गणेश पटेल, विजय शंकर यादव आणि दिलीप हरसुखलाल देसाई अशी या चौघांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी सुमारे २८ लाखांचा बोगस विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे.

अटकेनंतर चारही आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. मुंबई शहरात बोगस विदेशी मद्य स्कॉच विक्री करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकाऱ्यांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरू असताना जुहू तारा रोड, इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळील सिग्नलजवळून पोलिसांनी एका रिक्षातून चार आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी २४ बोगस विदेशी मद्याचा साठा जप्त केला.

चौकशीदरम्यान त्यांनी मालाड आणि मीरारोड येथे काही विदेशी मद्याचा साठा ठेवल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या अधिकाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी छापे टाकले होते. यावेळी या अधिकाऱ्यांना मीरारोड येथे आरोपींनी बोगस विदेशी मद्याचा कारखानाच सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर या कारखान्यातून या अधिकाऱ्यांनी विविध विदेशी कंपनीच्या बोगस मद्याचा साठा जप्त केला आहे.

तिन्ही कारवाईत या अधिकाऱ्यांनी १२५ विदेशी मद्याच्या बाटल्यांसह इतर साहित्य असा सुमारे २८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चारही आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत कारवाई करून नंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. तपासात ही टोळी ऑनलाईन विदेशी मद्याची डिलिव्हरी करत असल्याचे उघडकीस आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in