बनावट पोलीस अधिकाऱ्याला अटक

८० वर्षांचे वयोवृद्ध अंधेरी येथे राहत असून त्यांचा स्वतचा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे
बनावट पोलीस अधिकाऱ्याला अटक

मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करून लुटमार करणाऱ्या अली हसन अफसर ऊर्फ आबू जाफरी या आरोपीला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. आबू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यासह त्याच्या इतर सहकाऱ्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून आतापर्यंत अनेक गुन्हे केल्याचे बोलले जाते. ८० वर्षांचे वयोवृद्ध अंधेरी येथे राहत असून त्यांचा स्वतचा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. सध्या निवृत्त झाले आहेत. सकाळी नऊ वाजता ते नियमित वॉकसाठी जातात. २३ फेब्रुवारीला ते नेहमीप्रमाणे वॉकसाठी गेले होते. यावेळी नाना-नानी पार्कजवळील टेलिफोन बुथजवळ त्यांना तीन अज्ञात व्यक्तींनी अडविले. आपण गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांना इतके सोने का घातले आहे याबाबत विचारणा करुन दम देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील दागिने रुमालात ठेवण्यास सांगून काही वेळानंतर हालचलाखीने त्यांची सोन्याची चैन, दोन अंगठी मोबाईल आणि इतर १ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल घेऊन पलायन केले होते. हा प्रकार नंतर निदर्शनास येताच त्यांनी वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून या आरोपींचा शोध सुरु असतानाच दोन दिवसांपूर्वी आबू जाफरी या संशयिताला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच त्याच्या इतर सहकार्‍यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासात या टोळीने अशा प्रकारे अनेक गुन्हे केले असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. ही टोळी वयोवृद्धांना टार्गेट करुन प्रसंगी त्यांना दम देऊन त्यांच्याकडील दागिने घेऊन पलायन करत होते. याच गुन्ह्यांत आबू हा पोलीस कोठडीत असून त्याच्या इतर सहकार्‍यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in