मुंबई : रेल्वेत चांगले संबंध असून ६ लाख रुपये दिल्यास दोन महिन्यांत नोकरी लावतो, असे सांगत पैसे उकळणाऱ्या बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाने केला आहे. मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाने घाटकोपर स्थानकात सापळा रचून नरसिंह पै याला रंगेहाथ अटक केली.
१२ डिसेंबर रोजी नरसिंह पै यांच्याबद्दल लेखी तक्रार प्राप्त झाली होती. पै यांनी दावा केला होता की, त्यांचे रेल्वेत संपर्क असून ६ लाख रुपयांची इच्छित रक्कम प्रदान केल्यानंतर २ महिन्यांच्या आत नोकरी देऊ. पै यांनी तक्रारदाराला घाटकोपर स्टेशन येथे भेटण्यास सांगितले व सोबत एक लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यासही सांगितले. मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर तक्रार खरी असल्याची पडताळणी दक्षता पथकामार्फत करण्यात आली आणि त्यानुसार मुख्य दक्षता अधिकारी आणि निरीक्षकांच्या पथकाने २५ हजार रुपयांच्या सरकारी चलनासह रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचा घाटकोपर स्टेशनवर बनावट हँडलरला पकडण्यासाठी सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यात सापडलेली रक्कम सापळ्यासाठी दिलेल्या चलनाशी जुळली, जप्त केलेली सदर रक्कम आणि नोटांची संख्या सारखीच होती याची पक्की खात्री दक्षता पथकाने केली. नंतर आरोपी पै याच्या मोबाईलची तपासणी केली असता, तो पैसे गोळा करून बिहारमधील अन्य व्यक्तीस पाठवतो, असे निरीक्षणास आले. गुन्हेगार नरसिंह आर. पै याने कबुली दिली की, तो काही लोकांच्या संगनमताने रेल्वेमध्ये खोट्या नियुक्त्या देण्याचे काम करीत असे. भारतीय दंड विधान-४२० आणि ३४ अंतर्गत लोहमार्ग पोलीस यांचेमार्फत गुन्हेगार नरसिंह पै याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट भरतीच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतरांना पकडण्यासाठी पुढील तपास यंत्रणेमार्फत केला जात आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य दक्षता अधिकारी आणि वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली, अजय कुमार, के. डी. मोरे आणि राजकुमार सिंग, मुख्य दक्षता निरीक्षक आणि सुरक्षा कर्मचारी ए. एम. आव्हाड, अरविंद यांच्या दक्षता पथकाने बुडके आणि एस. एम. कोतवाल यांनी गुन्हेगाराला पकडण्यात मोलाचे काम केले.
... तर पोलिसांकडे तक्रार करा!
भारतीय रेल्वे लोकांना भरतीसाठी अशा बनावट हँडलर्सकडे न जाण्याचे आवाहन करत आहे. सर्व शासकीय यंत्रणेत निवड व भरती प्रक्रिया विशिष्ट मानक पद्धतीची आहे. कोणाला आजूबाजूला असा कोणताही अनूचित प्रकार सुरू असल्याचे आढळल्यास, त्यांनी पोलिसांकडे किंवा संबंधित दक्षता विभागाकडे तक्रार करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे.