आरे कारशेडच्या आंदोलनामागे खोटे पर्यावरणवादी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप

आरे कारशेडचे २५ टक्के काम आमच्या सरकारने पूर्ण केले होते आणि ती जागा राखीव वन क्षेत्रात मोडत नाही
आरे कारशेडच्या आंदोलनामागे खोटे पर्यावरणवादी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप

आरे कारशेडविरोधातील आंदोलनामागे छद्म किंवा खोटे पर्यावरणवादी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. कारशेड कांजूरमार्ग येथे स्थलांतरित केली, तर प्रकल्प खर्चात आणखी प्रचंड वाढ होऊन नाकापेक्षा मोती जड, अशी अवस्था होईल, असे त्यांनी सांगितले. आरे कारशेडचे २५ टक्के काम आमच्या सरकारने पूर्ण केले होते आणि ती जागा राखीव वन क्षेत्रात मोडत नाही. कारशेडचे काम पूर्ण होईपर्यंत मेट्रो प्रकल्प सुरू होऊ शकत नाही. कारशेडसाठी आधीच झालेल्या विलंबामुळे प्रकल्प खर्चात सुमारे १० हजार कोटी रुपये वाढ झाली असून कांजूरला जर कारशेड केली, तर काम पूर्ण होण्यास चार वर्षे लागतील आणि प्रकल्प खर्चात २०-२५ हजार कोटी रुपयांची वाढ होईल. त्यामुळे मूळ मेट्रो प्रकल्प १० हजार कोटी रुपयांचा, तर खर्चातील वाढ ही २० हजार कोटी रुपयांहून अधिक अशी परिस्थिती होईल. त्यामुळे आरेमध्येच कारशेड आवश्यक असून वर्षभराच्या आत काम पूर्ण होऊन मेट्रो रेल्वे लवकर सुरू होऊ शकेल. आता आरेतील आणखी झाडे तोडण्याची गरज नाही. जी कापणे आवश्यक होते, ती आधीच कापली गेली आहेत. त्यामुळे खऱ्या पर्यावरणवाद्यांचा कारशेडला अजून विरोध असेल, तर त्यांची समजूत काढली जाईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघरमध्ये ६४ टक्के भूसंपादन झाले आहे. भूसंपादनाचे काम तातडीने मार्गी लावून हा प्रकल्प वेगाने पुढे जाण्यासाठी आवश्यक पावले टाकणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in