प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियांची 'ईडी' कडून चौकशी

विख्यात कार डिझायनर असलेल्या दिलीप छाब्रिया यांच्याकडून अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या लक्झरी कार आणि एसयूव्ही डिझाईन करून घेतल्या आहेत
प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियांची 'ईडी' कडून चौकशी

कार डिझायनर आणि डीसी मोटर्सचे प्रमोटर दिलीप छाब्रिया यांची मनीलाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सोमवारी दुपारी चौकशी करण्यात आली. बलार्ड इस्टेट येथील मुंबई विभागीय कार्यालयात छाब्रिया यांना चौकशीसाठी बोलावले होते.

विख्यात कार डिझायनर असलेल्या दिलीप छाब्रिया यांच्याकडून अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या लक्झरी कार आणि एसयूव्ही डिझाईन करून घेतल्या आहेत. छाब्रिया यांनी अनेक व्हॅनिटी व्हॅन्स तसेच अभिनेत्यांच्या कारव्हॅन्स तसेच व्यावसायिक घरे डिझाईन केली आहेत. व्हॅनिटी व्हॅन डिझाईन करण्याच्या हेतूने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार कॉमेडियन कपिल शर्मा याने छाब्रिया यांच्याविरोधात दाखल केली आहे. अनेक नॉनबँकिंग आर्थिक कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेकडे अनेक तक्रारी आल्यामुळेच छाब्रिया यांची ‘ईडी’कडून चौकशी करण्यात आल्याचे समजते.

तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अध्यक्षतेखालील गुन्हे अन्वेषण विभागाकडून डिसेंबर २०२०मध्ये छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. सचिन वाझेच्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठी रक्कम मिळाल्याचा तपास सध्या ‘ईडी’ करत आहे. सध्या अनिल देशमुख आणि वाझे हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत आहेत.

छाब्रिया यांनी १२० डीसी अवंती कारची निर्मिती केली असून, त्यांनी बनवलेल्या अनेक कारमध्ये एकच इंजिन आणि चेसिस क्रमांक वापरल्याचे मुंबई पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. एकाच कारसाठी त्यांनी विविध कंपन्यांकडून कर्जापोठी मोठी रक्कम उभारली होती. त्यांच्या पुणे येथील फॅक्टरीमधून पोलिसांनी तीन कार आणि ४० कार इंजिन जप्त केले होते. हे कोट्यवधी रुपयांचे रॅकेट असून, छाब्रिया आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अवंती कारच्या माध्यमातून मोठी आर्थिक फसवणूक केली आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in