प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल शर्मा आहेत. संतूर वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यात पंडित शिवकुमार शर्मा यांचे मोलाचे योगदान होते.

शिवकुमार शर्मा हे उत्तम गायकही होते. त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री तर २००१ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. १९८५ मध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांना बाल्टिमोर या संयुक्त राज्याचे मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आले आहे.

काश्मीरमधील संतूर या लोकवाद्याला अभिजात संगीत विश्वात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय सिनेसंगीतातही फार मोलाची कामगिरी बजावली आहे. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शिव-हरी’ या नावाने ओळखली जायची. ‘शिव-हरी’ या जोडीने अनेक सिनेमांना संगीतबध्द केले असून यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (१९८०) हा त्यांचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘डर’ (१९९३) या गाजलेल्या सिनेमांना संगीत दिले.

१९६७ मध्ये ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा त्यांचा अल्बम तुफान लोकप्रिय झाला होता. या अल्बममध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in