गुट्टी कलम पद्धतीमुळे झाडांची झपाट्याने वाढ दोन महिन्यांत ८ ते १० फूट रोपांची निर्मिती

पालिकेच्या उद्यान विभागाचा यशस्वी प्रयोग
गुट्टी कलम पद्धतीमुळे झाडांची झपाट्याने वाढ दोन महिन्यांत ८ ते १० फूट रोपांची निर्मिती

मुंबई : विविध प्रजातींची रोपे तयार करण्यासाठी गुट्टी कलम पद्धतीचा प्रयोग पालिकेच्या टी वॉर्डात ( मुलुंड) येथे करण्यात आला. टी वॉर्डातील उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुट्टी कलम पद्धतीचा अवलंब केला आणि वडाची एक हजारांहून अधिक रोपे तयार करण्यात आली. उद्यान विभागाचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने पालिकेच्या २४ वॉर्डात अशा पद्धतीने रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याच्या विविध विभागातील रोपवाटिकेत विविध प्रकारच्या देशी वृक्षांची रोपे बनविण्यात येतात. त्यामध्ये प्रामुख्याने वड, कृष्णवड, कुंती, लिंबूवर्गीय झाडांची रोपे, तसेच इतर दीर्घायुषी देशी प्रजातींची हजारो रोपे तयार करण्याचे काम उद्यान विभागामार्फत केले जाते. त्याकरिता विविध पद्धतींचा वापर करण्यात येतो. त्यापैकीच एक पद्धत म्हणजे गुट्टी कलम सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर यापध्दतीचा वापर करून टी विभागातील उद्यान कर्मचा-यांनी वडाच्या झाडाची १ हजारपेक्षा अधिक रोपे तयार केली. त्यानंतर याच पद्धतीचा वापर करत उद्यान खात्याच्या विविध विभागांमध्ये या पद्धतीने दोन महिन्याच्या कालावधीतच ८ ते १० फूट उंचीची हजारो रोपे तयार करण्यात आली आहेत.

उद्यान खात्याचे मुख्यालय असलेल्या राणी बागेतील नर्सरीमध्येही याच पद्धतीचा अवलंब करून असंख्य रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. अशाप्रकारे तयार केलेली वडाच्या झाडाची १ हजार पेक्षा अधिक रोपे आतापर्यंत उद्यान खात्याच्या ७ झोन आणि २४ विभागांतील विविध उद्यानांमध्ये लावण्यात आल्याचे ते म्हणाले.

प्रतिक्रिया

देशी प्रजाती वाचवण्यासाठी नवनवीन प्रयोग!

नवनवीन पद्धतींचा अवलंब करत, देशी प्रजाती वाचवण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

- जितेंद्र परदेशी, अधीक्षक उद्यान विभाग

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in