
मुंबई : कुर्ला येथील एलबीएस रोडवर रात्री १० च्या सुमारास एक बेस्ट बस गर्दीत घुसली. या भरधाव बसने पादचारी व वाहनांना दिलेल्या धडकेत ३ जणांचा मृत्यू, तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांसह बचाव व मदतकार्य सुरू केले.
बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेस्ट क्रमांक ३३२ ही बस कुर्ला येथून अंधेरीकडे जात होती. त्याचवेळी बेस्ट बसचा ब्रेक फेल होऊन बौद्ध कॉलनीजवळील आंबेडकर नगर येथे हा अपघात झाला. या बसने अनेक गाड्यांना तसेच पादचाऱ्यांना धडक दिली.
लालबहाद्दूर शास्त्री मार्ग हा (एलबीएस रोड) हा अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे. तिथे बाजारही असल्याने लोकांची गर्दी असते. सोमवारी रात्री या परिसरात भरधाव बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक दिली. या धडकेत काही रिक्षांचा चक्काचूर झाला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता.
या अपघातानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत गर्दीला हटवत बचावकार्याला सुरुवात केली. कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात २० जखमींना दाखल केले आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत. बेस्ट चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.