वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू, दहा जखमी

अपघाताला जबाबदार असलेल्या इरफान अब्दुल रहिम बिलकिया याला वरळी पोलिसांनी अटक केली आहे.
वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू, दहा जखमी

वांद्रे-वरळी सी लिंकवर मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या विचित्र अपघातात मृत्यूचा थरार सर्वांनी अनुभवला. चार कार आणि एका रुग्णवाहिकाची धडक लागून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन डॉक्टरचा समावेश आहे. या सर्वांवर विविध शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. अपघाताला जबाबदार असलेल्या इरफान अब्दुल रहिम बिलकिया याला वरळी पोलिसांनी अटक केली आहे.

वांद्रे-वरळी सी लिंकवर उत्तररात्री सव्वादोन वाजता पोल क्रमांक ७६ ते ७८ दरम्यान हा अपघात झाला. सी लिंकवरून रात्री उशिरा एक स्विफ्ट कारमधून सिद्धार्थ, रिहान, आलिशा आणि साने हे चौघेही जात असताना पोल क्रमांक ७६ जवळ येताच या कारचा टायर फुटला आणि कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले. यावेळी मागून येणाऱ्या बोलेरो कारने स्विफ्ट कारला जोरात धडक दिली. बोलेरो कारमध्ये नील एकटाच प्रवास करत होता. अपघाताची माहिती मिळताच टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी वरळी पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर एक खासगी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. अपघातानंतर मदतकार्य सुरू असताना अचानक तेथून जाणाऱ्या एका ह्युंडाई कार मर्सिडिझला धडक देत रुग्णवाहिकेसह अन्य अपघातग्रस्त कारवर जाऊन आदळली. या अपघातात १५ जण जखमी झाले. जखमींना नंतर मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल केले असता, त्यापैकी चेतन कदम, सोमनाथ साळवे, गजरात सिंग, सतेंद्र सिंग आणि राजेंद्र सिंग या पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. दोघांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले तर इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून अन्य तीन जखमींना लिलावती, सैफी आणि ग्लोबल या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातानंतर ह्युंडाई क्रेटाचा चालक इरफान तेथून पळून गेला होता. त्याला मोहम्मद अली रोडवरील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in