रेल्वे रूळ ओलांडून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

या संदर्भात मंगळवारी शिवसेनेकडून पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी व राजेश कंकाळ यांना निवेदन देण्यात आले आहे.
रेल्वे रूळ ओलांडून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
ANI

मुंबई : शिवडी-वरळी व शिवडी-न्हावा शेवा उन्नत मार्गांचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी लागणारे साहित्य वाहतूक करणाऱ्या गाड्यांची सतत ये-जा सुरू असते. शिवडी-वरळी व शिवडी-न्हावा शेवा उन्नत मार्गांच्या कामामुळे या भागातील पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली बेस्ट बस चार महिन्यांपूर्वी बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना रेल्वे रुळ ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. तसेच सतत वाहतूक सुरु असल्याने रस्ते अपघाताचाही धोका आहे. त्यामुळे

ही बससेवा पूर्ववत करण्याची मागणी पालक, विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात बस सेवा पूर्ववत न झाल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

शिवडी, कॉटनग्रीन प्रभाग क्रमांक २०६ हा विभाग पूर्व पश्चिम असा विभागला असून या भागात प्रबोधनकार ठाकरे शाळा तसेच शिवडी कोळीवाडा व अभ्युदय नगर या पालिकेच्या शाळांमध्ये शिवडी पूर्वेकडून विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांना पूर्व मुक्त मार्गाखालून अवजड वाहनांमधून मार्ग काढत शिवडी कोळीवाडा तसेच  फाटक ओलांडून प्रबोधनकार ठाकरे शाळेत पश्चिमेकडे जावे लागते. विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेऊन सन २०१८ मध्ये विभागातील विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी बेस्ट बस सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र कोणतेही कारण न देता ऑगस्ट २०२३ पासून ही सेवा बंद करण्यात आली. या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये पत्रव्यवहार केल्यानंतर शिक्षण विभागाने ही सेवा थोड्या दिवसात चालू होईल, असे आश्वासन दिले होते; मात्र चार महिने उलटून ही बेस्ट बस सेवा चालू करण्यात आलेली नाही. या संदर्भात मंगळवारी शिवसेनेकडून पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी व राजेश कंकाळ यांना निवेदन देण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in