लालबाग पुलावर कार-दुचाकीचा भीषण अपघात; बाप-लेकाचा मृत्यू, माय-लेकीची प्रकृती गंभीर

एकत्र वेळ घालवण्याकरिता दक्षिण मुंबईत गेलेले हे कुटुंब रविवारी रात्री घरी परतत असताना, त्यांना लालबाग उड्डाणपुलावर डॉ. निर्मल पार्क रेल्वे कॉलनीजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर...
लालबाग पुलावर कार-दुचाकीचा भीषण अपघात; बाप-लेकाचा मृत्यू, माय-लेकीची प्रकृती गंभीर

मुंबई : परेल येथील लालबाग उड्डाणपुलावर रविवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीवरील बापलेकाचा मृत्यू झाला असून मायलेकीची प्रकृती अत्यवस्थ आहे.

भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मित्सुबिशी लँसर कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असून त्यात ३९ वर्षीय सोहेल शेख तसेच त्याचा १२ वर्षांचा मुलगा मोहम्मद अली शेख या दोघांचा मृत्यू झाला असून पत्नी आसमा (३५) आणि मुलगी फातिमा (४ वर्षे) या दोघींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एकत्र वेळ घालवण्याकरिता दक्षिण मुंबईत गेलेले हे कुटुंब रविवारी रात्री घरी परतत असताना, त्यांना लालबाग उड्डाणपुलावर डॉ. निर्मल पार्क रेल्वे कॉलनीजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर एका कारने अनपेक्षित धडक दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळेस उड्डाणपुलावर वाहनांची तसेच लोकांची वर्दळ कमी असल्याने कारचालक हमझा शेख (२१) वेगाने गाडी हाकत होता. रात्री १०.२० वाजताच्या सुमारास त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याची कार दुभाजकाला आदळली. त्यानंतर ती समोर येऊन आदळली. त्याच वेळेला समोरून दुचाकीवरून हे कुटुंब चालले असताना, कार आणि दुचाकीमध्ये जोरदार टक्कर झाली. त्यावेळी बापलेक दूरवर फेकले गेले, तर मायलेकी रस्त्यावर कोसळल्या.

या चौघांनाही केईएम रुग्णालयात दाखल केले असता, वडील आणि मुलाला मृत घोषित करण्यात आले. आई आणि मुलीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे काळाचौकी पोलिसांनी सांगितले. आसमा हिला गंभीर दुखापती झाली असून खांदा, पाय आणि मनगटाला जबर मार बसला आहे. कारचालक हमझा याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी त्याला स्थानिक कोर्टात हजर केले असता, जामीन मंजूर करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in