भारतीय बँकिंगचे पितामह एन. वाघूळ यांचे निधन

भारतीय बँकिंग व्यवसायाचे पितामह एन. वाघूळ यांचे शनिवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
भारतीय बँकिंगचे पितामह एन. वाघूळ यांचे निधन

मुंबई : भारतीय बँकिंग व्यवसायाचे पितामह एन. वाघूळ यांचे शनिवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. भारतीय बँकिंग क्षेत्रात त्यांनी अनेक नेतृत्वाची पदे भूषवली. आयसीआयसीआय या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे खासगी बँकेत रूपांतर करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली. त्यांच्या निधनाने उद्योगजगतात शोककळा पसरली आहे.

आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याने वाघूळ यांना चेन्नईच्या रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. तेथे त्यांचे निधन झाले.

१९६० च्या काळात वाघूळ यांनी स्टेट बँकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट या संस्थेत शिकवायला सुरुवात केली. दोन वर्षे तेथे काम केल्यानंतर सेंट्रल बँकेत ते कार्यकारी संचालक म्हणून परतले, तर वयाच्या अवघ्या ४४ वर्षी १९८१ मध्ये ते बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनले.

१९८५ पासून ११ वर्षे त्यांनी आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले. आयसीआयसीआय बँकेत अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी बँकर्सची नवीन पिढी तयार केली. १९९६ पर्यंत ते आयसीआयसीआय बँकेत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर काम केले.

२००६ मध्ये त्यांना पद‌्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी शोक व्यक्त केला. मला भेटलेल्या प्रेरणादायी व उदार व्यक्तिमत्त्वासाठी मी शोक व्यक्त करत आहे. मी जेव्हा सीईओ म्हणून काम पाहू लागलो तेव्हा त्यांची चांगल्या व वाईट प्रसंगी मला समर्थन व प्रोत्साहन दिले, तर उद्योगपती किरण मुझुमदार शॉ म्हणाल्या की, वाघूळ हे माझे गुरू व मित्र होते. त्यांचे कार्य येणाऱ्या पिढी लक्षात ठेवतील, असे त्या म्हणाल्या.

भारताच्या आर्थिक क्षेत्रात मोठे योगदान - दास

वाघूळ यांनी भारताच्या आर्थिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. ते द्रष्टे नेते होते. त्यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो, अशी श्रद्धांजली आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in