मिठाई, खवा विक्रेते 'एफडीए'च्या रडारवर; भेसळयुक्त दुकानांवर होणार कारवाई

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई, खवा, पनीर, खाद्यतेल, रवा, बेसन यांची विक्री करणारे दुकानदार आस्थापना आता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) रडारवर आले आहेत. भेसळयुक्त मिठाई, खवा, पनीर, खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त मंगेश माने यांनी दिला आहे.
Photo - Canva
Photo - Canva
Published on

मुंबई : सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई, खवा, पनीर, खाद्यतेल, रवा, बेसन यांची विक्री करणारे दुकानदार आस्थापना आता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) रडारवर आले आहेत. भेसळयुक्त मिठाई, खवा, पनीर, खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त मंगेश माने यांनी दिला आहे. दरम्यान, ११ ऑगस्टपासून राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत ४२ आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली असून ५५ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ चा प्रमुख उद्देश जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध करून देणे हा असून त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासन नेहमीच कार्यरत असते. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा व दिवाळी या सणासुदीनिमित्त अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई यांच्यामार्फत 'सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा' या अभियानाअंतर्गत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सणांदरम्यान मिठाई, खवा, पनीर तूप, खाद्यतेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा, सुकामेवा आदी खाद्यपदार्थांची मागणी वाढते. यात भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्नस्थापनांची तपासणीची मोहीम २५ ऑक्टोबरपर्यंत राबवणार आहे.

या कालावधीत मिठाई, फरसाण, ड्रायफ्रूट या अन्नपदार्थांच्या उत्पादकांपासून ते किरकोळ विक्रेता दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. ज्या आस्थापनांमध्ये तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे आढळून येईल, अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबईचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी दिला आहे.

२१८ किलो चीज केले नष्ट

२५ ऑगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई व कंट्रोल युनिट क्राईम ब्राँच, मुंबई पोलीस यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली. अॅटॉप हिल, मुंबई परिसरात लेबल नसलेल्या चीज ॲनालॉग या पनीर सदृश्य अन्न पदार्थाची विक्री होत असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणाहून चीज ॲनालॉगचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन त्यांचा उर्वरित साठा २१८ किलो (किंमत ५४ हजार ६२५ रुपये) नष्ट करण्यात आला.

येथे तक्रार करा

कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक व गरजेचा असल्याने कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाचा १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन मंगेश माने यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in