

मुंबई : मुंबईच्या वातावरणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठे बदल जाणवू लागले आहेत. पूर्वेकडून येणारे उष्ण, दमट वारे आणि अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत व उकाडा वाढला आहे. सलग तीन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान वाढले असून वाऱ्यांच्या बदललेल्या दिशेमुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
उष्णतेसोबतच मुंबईकर सध्या वायू प्रदूषणाच्या समस्येशीही झुंज देत आहेत. एप्रिल-मे महिन्याआधीच पारा वाढल्याने आगामी काळात उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईचे कमाल तापमान वाढले
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून, मुंबईकर सध्या विचित्र हवामानाचा सामना करत आहेत. डिसेंबरचा शेवट आणि
जानेवारीच्या सुरुवातीला कडाक्याची थंडी अनुभवल्यानंतर, आता अचानक उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. वाऱ्याच्या बदललेल्या दिशेमुळे अरबी समुद्रावरून येणारे थंड वारे दुपारी उशिरा स्थिर होत असल्याने सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत आहे. त्यामुळे सलग तीन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३५ सें. वर पोहोचले आहे.
देशाच्या विविध भागांत अवकाळीचा इशारा
भारतीय हवामान विभागाने देशाच्या विविध भागांसाठी पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे, पुढील ४८ तासांत हवामानात लक्षणीय बदल अपेक्षित आहेत. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस, बर्फवृष्टी, धुके आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या मते, सध्या दोन पश्चिमी वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसासह मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीची शक्यता आहे. या भागातील हवामान पुढील दोन दिवस खराब राहण्याची शक्यता असून, ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पावसाचा जोर पुन्हा वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे दैनंदिन जीवनात व्यत्यय येऊ शकतो.
मुंबईकरांची होतेय कोंडी ...
काही दिवसांपूर्वीपर्यंत मुंबईकर वायू प्रदूषणाने त्रस्त होते. त्यातच आता किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच गॉगल, टोपी आणि स्कार्फचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.